Shahrukh Khan’s Must Watch Movies : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्यानं त्याच्या हटके स्टाईलनं आणि अभिनयशैलीनं अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे त्याला ‘बॉलीवूडचा बादशाह’ म्हटलं जातं. सध्या अभिनेता चर्चेत आहे याचं कारण म्हणजे त्याला नुकताच मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार.
शाहरुख खाननं आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, तब्बल ३३ वर्षं इंडस्ट्रीत काम केल्यानंतर इतक्या वर्षांच्या परिश्रमानंतर त्याला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्याला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला आहे. त्यानिमित्तच आम्ही तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या शाहरुख खानच्या अशा चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवे.
स्वदेस
आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्वदेस’ हा शाहरुख खानच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुखच्या करिअरमधील हा असा सिनेमा आहे, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता, असं आजही अनेकांना वाटतं. परंतु, असं झालं नसलं तरी यातील त्याच्या कामासाठी त्याचं अनेकांकडून कौतुक झालं. ‘स्वदेस’बद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये त्यानं मोहन भार्गव ही एका एनआरआय शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, जो पुन्हा एकदा त्याच्या भारतीय मुळांशी जोडला जातो. स्वदेस भारतातील ग्रामीण जीवन, सामाजिक जबाबदारी यावर भाष्य करतो.
चक दे इंडिया
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खाननं एका हॉकी कोचची भूमिका साकारली आहे. त्यामधील त्याच्या भूमिकेनं विशेष लक्ष वेधलं होतं. या चित्रपटात महिला हॉकी संघाला कोणकोणत्या अडचणींचा समना करावा लागतो याबद्दल दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये शाहरुखनं कोच कबीर खानची भूमिका साकारलेली.
माय नेम इज खान
करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान व काजोल मुख्य भूमिकांत झळकले होते. त्यातील शाहरुखच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं होतं. चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्षं झाल्यानंतर २०१७ मध्ये जागतिक स्तरावर ओळखले जाणारे लेखक पावलो कोएलो यांनी ट्वीट करीत शाहरुख खानला या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर मिळायला हवा होता, अशी इच्छा व्यक्त केलेली.
बाजीगर
‘बाजीगर’ हा चित्रपट शाहरुख खानच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यातील त्याचा अभिनय, गाणी यांची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर’चा पुरस्कार मिळालेला. ‘अ किस बिफोर डाईंग’ या हॉलीवूड चित्रपटातून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आलेला.
देवदास
संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये कायम उत्सुकता असते. ‘देवदास’ हा त्यांच्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकलेला. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित पाहायला मिळालेल्या. या चित्रपटात त्याने व्यसनाच्या आहारी गेलेल्या देवदासची भूमिका साकारलेली, जो स्त्रियांचा अपमान करतो, स्वत: खूप दु:खात असतो, असं पाहायला मिळालेलं. त्याच्याबरोबर ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित यांच्या भूमिकांनीही अनेकांचं लक्ष वेधलेलं आणि त्यातील गाणी त्या काळी प्रचंड गाजलेली.
वीर झारा
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘वीर झारा’ हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झालेला. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री प्रीती झिंटा झळकलेली. त्याव्यतिरिक्त चित्रपटात अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, हेमा मालिनी यांसारखे कलाकार पाहायला मिळाले होते. शाहरुख खाननं त्यामध्ये एका भारतीय नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली, ज्याला अनेक वर्षं पाकिस्तानमध्ये तुरुंगात ठेवण्यात आलेलं.
कल हो ना हो
शाहरुख खान, प्रीती झिंटा, सैफ अली खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशा रडवतो. त्यात शेवटी शाहरुख खानच्या पात्राचं निधन होतं, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात या त्रिकुटानं त्यांच्या अभिनयानं अनेकांना हसवलं आणि रडवलंसुद्धा. या चित्रपटानं आपण वर्तमानात राहून प्रत्येक क्षण आनंदानं जगणं किती गरजेचं असतं याचं महत्त्व पटवून दिलं आहे. शाहरुख खानच्या पात्रानं विशेष लक्ष वेधलं होतं. त्यातील गाणी आजही अनेकांच्या आवडत्या गाण्यांपैकी आहेत.
