Bollywood Actress Comeback: एका म्युझिक व्हिडीओमधून करिअरची सुरुवात करणारी आणि बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर एका लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक चित्रपटांत काम करणे थांबवले होते. फक्त चार वर्षांच्या कालावधीत ती १५ चित्रपटांत दिसली होती. आता ही अभिनेत्री नेमकी कोण? ते जाणून घेऊ…

२००० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक, अशी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समीरा रेड्डीची ओळख आहे. तिच्या अनेक उत्तम भूमिकांमुळे ती लोकप्रिय झाली होती. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा होता. इतकी लोकप्रियता असताना अभिनेत्रीने अचानक चित्रपटांतील काम सोडले. ती प्रसिद्धीझोतापासून दूर गेली. १३ वर्षांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटात काम करताना दिसलेली नाही.

१३ वर्षानंतर करणार पुनरागमन

आता अभिनेत्रीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे समीरा रेड्डी १३ वर्षांच्या मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभिनेत्री समीरा रेड्डी १३ वर्षांनंतर ‘चिमणी’ या हॉरर चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट गगन पुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच नितेश कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

१० जुलै २०२५ ला ‘चिमणी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. समीरा रेड्डीव्यतिरिक्त या चित्रपटात प्राची ठाकूर, सौरभ अग्निहोत्री, आदित्य कुमार, शार्दुल राणा व प्रीती चौधरी मुख्य भूमिकांत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिने अभिनय क्षेत्रात पुन्हा काम करण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणालेली, “एक वर्षापूर्वी माझ्या मुलगा माझा ‘रेस’ हा चित्रपट बघत होता. तो चित्रपट बघताना त्याने मला विचारले की, तू चित्रपटात आहेस; आता तशी दिसत नाहीस. आई, तू अभिनय का करत नाहीस? त्यावर मी त्याला म्हणाले की, सध्या मी तुझी आणि तुझ्या बहिणीची काळजी घेण्यात व्यग्र आहे. त्याच्याबरोबर झालेल्या या बोलण्यामुळे मी जो अभिनयापासून दूर राहण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यावर मी पुन्हा विचार केला. त्यानंतर मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला.”

समीराने ‘मैंने दिल तुझको दिया’ या २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली. हा एक रोमँटिक ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता. हा सिनेमा सोहेल खान व अझीम शेख यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाची पटकथा रणजीत गुप्ता यांनी लिहिली होती. या चित्रपटात सोहेल खान, संजय दत्त, कबीर बेदी, दलीप ताहिल, राजपाल यादव, अमृता प्रकाश आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत.

‘दे दना दन’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘मुसाफिर’, डरना मना है, रेस, वेट्टई, आक्रोश या चित्रपटांतील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.