Shilpa Shirodkar Shared A Post For Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीदेखील त्यांचे चाहते आहेत. अनेक कलाकार बिग बींबद्दल अनेकदा बोलताना दिसतात. अशातच नुकताच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकरनेही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘बिग बॉस’मध्ये झळकलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर एकेकाळी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिने इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे, त्यातील एक म्हणजे अमिताभ बच्चन. शिल्पाने त्यांच्याबरोबर ‘खुदा गवाह’, ‘हम’ या चित्रपटांत काम केलं आहे. अशातच अभिनेत्रीने बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबरचा जुना फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिल्पा शिरोडकरला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर करायचं होतं लग्न

शिल्पाने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने तिची एक जुनी इच्छादेखील सांगितली आहे. शिल्पाने ‘खुदा गवाह’ चित्रपटातील अमिताभ यांच्याबरोबरचे दोन फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिली आहे. तिने दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यामधून तिने “मला लहानपणी ज्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि ज्यांनी मला सहकलाकार म्हणून खूप काही शिवकलं, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खुदा गवाह’ चित्रपटात अमिताभ बच्चन, श्रीदेवी, नागार्जून, शिल्पा शिरोडकर, किरण कुमार हे कलाकार झळकलेले. यासह शिल्पाने अमिताभ यांच्याबरोबर ‘हम’ चित्रपटातही काम केलेलं. मुकुल आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन व शिल्पा यांच्याबरोबर रजनीकांत, गोविंदा, दीपा साही, अनुपम खेर, कादर खान हे लोकप्रिय कलाकार झळकले होते.

शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’मध्येही झळकलेली. यामधून ती पुन्हा एकदा चर्चेत आली. शिल्पा यानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबरोबर ‘जटाधरा’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामधून ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल. शिल्पा या व्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि यामार्फत ती तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल तसेच कामाच्या अपडेट तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.