Shilpa Shirodkar Talks About Mahes Babu : शिल्पा शिरोडकर बॉलीवूडमधील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी होती. परंतु, तिनं मधळ्या काळात मोठा ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. ‘बिग बॉस’मुळे ती पुन्हा चर्चेत आली. शिल्पा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या कुटुंबीयांबद्दलही सांगत असते. अशातच आता तिनं तिचे भावोजी महेश बाबूबद्दल सांगितलं आहे.
महेश बाबू लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता आहे. दक्षिणेत त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. शिल्पा तिची बहीण नम्रता व महेश यांच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. त्याशिवाय त्यांच्याबद्दल बोलतही असते. अशातच आता तिनं तिच्या भावोजींचं भरभरून कौतुक केलं आहे. यावेळी तिनं महेश बाबू खूप चांगला माणूस आहे आणि ती त्याची फॅन आहे, असं म्हटलं आहे.
शिल्पा शिरोडकरने केलं महेश बाबुचं कौतुक
शिल्पानं प्रेमासह संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “तो माझ्या कुटुंबासारखाच आहे आणि मी आजवर भेटलेल्या चांगल्या माणसांपैकी एक आहे. एक अभिनेत्री म्हणून मी त्याची फॅन आहे. तो माझा भावोजी आहे आणि खरं सांगायचं झालं, तर तो अशा माणसांपैकी एक आहे, ज्याला नेहमी प्रत्येकाचं चांगलं व्हावं, असं वाटतं. त्याला कुठलाही हेवा वाटत नाही, कोणाचंही वाईट व्हावं, असं कधीच वाटत नाही. तो जसा दिसतो तसाच आहे.”
महेश बाबू अनेकदा चांगल्या चित्रपटांना पाठिंबा देताना दिसतो. तो अनेकदा सोशल मीडियावर चांगल्या चित्रपटांसंबंधी पोस्ट करीत त्यांना प्रोत्साहन देत असतो. मुलाखतीत शिल्पाला जेव्हा तिला महेश बाबूबरोबर काम करायला आवडेल का, असं विचारलं गेल्यानंतर ती म्हणाली, “नाही मी अजून असा विचार केला नाहीये. पण, कदाचित जर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला तर… मी अजून त्याला याबद्दल विचारलं नाहीये.” शिल्पा लवकरच ‘जटाधरा’ चित्रपटातून झळकणार आहे.
शिल्पा शिरोडकर लवकरच वेंकट कल्याण व अभिषेक जैस्वाल दिग्दर्शित ‘जटाधरा’ या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. त्यातील तिच्या भूमिकेचं नाव शोभा, असं आहे. त्या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. येत्या ७ नोव्हेंबरला हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शिल्पासाठी खास आहे. कारण- त्याद्वारे ती मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे.
