The Po Po song returns in Son of Sardaar 2: ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २०१२ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात काही बदल झाले आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाऐवजी अभिनेत्री मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केले आहे.

सध्या सन ऑफ सरदार २ ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच चित्रपटातील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पहला तू…’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यातील डान्स स्टेप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. कोणतीही हालचाल न करता फक्त बोटांची हालचाल करून या गाण्यातील काही ओळींवर अजय देवगण व मृणाल ठाकूरने डान्स केला होता. त्यानंतर अजय देवगणला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. त्याच्या या डान्स स्टेप्सवरून त्याचे मीम्सही बनवण्यात आले होते.

‘सन ऑफ सरदार २’मधील नवं गाणं रिलीज

आता या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘पो पो’ असे या गाण्याचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे सन ऑफ सरदार मध्येदेखील हे गाणे होते. या गाण्यातील मजेशीर हावभावांमुळे आजही ते गाणे लक्षात आहे. या गाण्यातून सलमान खानने कॅमिओ केला होता. आता दुसऱ्या भागातील या गाण्यात मात्र सलमान खान नसल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यात अजय देवगण, मृणाल ठाकूर, गुरु रंधावादेखील दिसत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता हे गाणे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मजेशीरपणे लिहिले, “अजय देवगणच्या डान्स स्किल्स दिवसेंदिवस चांगल्या होत आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “संजय दत्त या गाण्यामध्ये पाहिजे होते”, हे गाणे जबरदस्तीने बनवले आहे”, “या अशा डान्स स्टेप आहेत, ज्या मी आत्मविश्वासाने करू शकतो”, “कॉलेजच्या दिवसांत या गाण्यावर खूप डान्स केला आहे”, “या गाण्यात कोणा-कोणाला सलमान खानची आठवण आली?”, “अजय सरांनी मीम्सला जरा जास्तच गांभिर्याने घेतले”, “सरावाने परिपूर्णता येते. १० वर्षांपूर्वी अजय देवगण बस तेरी बस तेरी गाण्यात फक्त एका बोटाचा वापर करत असे. आता तो त्याच्या सगळ्या बोटांचा वापर करतो” “सन ऑफ सरदार २ हिट होणार”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

तर अनेकांनी गुरु रंधावाचे कौतुक केले आहे. हे वर्ष गुरु रंधावाचे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. तर काहींनी गुरु रंधावाला कोणी थांबवू शकत नाही, असे म्हटले. दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ हा सिनेमा २५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.