Vidya Balan Talks About Amitabh Bachchan : विद्या बालननं आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. साचेबद्ध पद्धतींच्या भूमिकांत न अडकता तिनं नेहमीच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु एकदा अभिनेत्रीला चक्क अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात काम न करण्याबद्दल सांगण्यात आलेलं.
विद्या बालन अभिनयासह सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिथे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री कायम ठामपणे तिची मतं, तिचे अनुभव सांगत असते. अशातच तिनं अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या चित्रपटात तिला काम न करण्याबद्दल सांगण्यात आल्याचं तिनं म्हटलंय.
विद्या बालननं ‘फिल्मफेअर’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं आहे. विद्यानं अमिताभ यांच्या ‘पा’ चित्रपटात काम केलं होतं. त्यामध्ये तिनं अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारलेली. त्याबाबत ती म्हणाली, “जेव्हा मला आर. बाल्की यांनी या चित्रपटासाठी विचारलं होतं तेव्हा मी त्यांना वेड्यात काढलेलं. त्यांना मी व अभिषेकने अमिताभ यांच्या पालकांची भूमिका साकारावी, असं वाटत होतं”.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाबद्दल विद्या बालनचं वक्तव्य
विद्या बालन पुढे याबाबत म्हणाली, “जेव्हा त्यांनी मला या चित्रपटाची कथा सांगितली तेव्हा मी पुन्हा पुन्हा तोच विचार करत होते. माझ्यातील कलाकार मला हे कर, असं सांगत होता; पण मी घाबरले होते. त्यावेळी अनेकांनी मला ताकीद दिली होती की, तू हा चित्रपट केलास आणि त्यामध्ये मोठ्या वयाच्या महिलेची भूमिका साकारलीस, तर तुझं करिअर संपेल. पण तेव्हा मी माझ्या एका लेखक व चित्रपट निर्मात्या मित्राला ही कथा वाचायला सांगितली आणि त्यांनी मला ही भूमिका कर, असं सांगितलेलं.”
या भूमिकेबद्दल विद्या बालन पुढे म्हणाली, “त्यांतर मी इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या मनातील गोष्ट ऐकली. मी पूर्वी असे काही चित्रपट केले आहेत, ज्यामध्ये काम करताना मला अजिबात आनंद नाही मिळाला. म्हणून त्यानंतर पुन्हा मला कधीच असं वाटलं नाही पाहिजे याची काळजी घेते.”