Vijay Deverakonda On Chhaava Movie: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांपासून ते अनेक लोकप्रिय कलाकारांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले.

विजय देवरकोंडा काय म्हणाला?

आता लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने छावा चित्रपटाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. विजय देवरकोंडाने अभिनेता सूर्याचा आगामी चित्रपट ‘रेट्रो’च्या हैदराबाद येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले की, जर त्याला भूतकाळात जाऊन कोणाला भेटायचे असेल, तर तो कोणाला भेटेल? यावर विजय देवरकोंडा म्हणाला, “मला ब्रिटिशांना भेटून, त्यांना जोरात दोन कानाखाली द्यायला आवडतील.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मी नुकताच छावा हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मला राग आला. मला औरंगजेबाला दोन-तीन कानाखाली द्यायला आवडेल. अशा अनेकांना फक्त मारण्यासाठी मला भेटायला आवडेल. सध्या तरी मी इतकाच विचार करीत आहे.”

तसेच ज्योतिका व सोनाली बेंद्रे यांच्याबरोबर काम करायला आवडेल, असेही विजय देवरकोंडाने म्हटले. विजय देवरकोंडाच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो २०२४ ला प्रदर्शित झालेल्या द फॅमिली स्टार या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्याने प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या कल्की २८९८ एडी या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. अभिनेता सूर्याची प्रमुख भूमिका असलेला रेट्रो हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. तसेच, लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.

विकी कौशलला या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. लवकरच तो संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.