साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’वरून मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. चित्रपटाची कथा आणि त्यात दाखवण्यात आलेल्या संवादावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. देशभरात या विरोधात निदर्शने होत आहेत. हा गोंधळ पाहून आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे स्वत:च्या सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जिवाला धोका असल्याची भीती मनोज यांनी व्यक्त केली आहे. मनोज यांच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा- “हे असले चित्रपट…”; ‘आदिपुरुष’च्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या कथेवरून आणि संवादांवरून प्रेक्षकांनी चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. चित्रपटातील संवादांवरून देशभरात खळबळ उडाली आहे. चित्रपट निर्मात्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व मराठी कलाकार देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. अवघ्या दोन दिवसांत ‘आदिपुरुष’ने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने ६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
