देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज अनेक लोकांना करोनाची लागण होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. अभिनेता गोविंदानेही काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. पण आता आपुन आ गयेला है म्हणत त्याने नव्या जोशात कामाला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच गोविंदाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत होती. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, “माझीही करोना चाचणी झाली आहे. करोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी मी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. आज माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला करोनाची सौम्य लक्षणे आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच माझी पत्नी सुनीताला करोनाची लागण झाली होती.”
त्यानंतर आता गोविंदाने आपल्या आरोग्याबद्दलची माहिती दिली आहे. गोविंदा आता बरा झाला असून त्याची करोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्याने इन्स्टाग्रामला त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली. अगदी स्वॅगमध्ये दरवाजा उघडत असतानाचा हा बुमरँग व्हिडिओ आहे. गोविंदाने या व्हिडिओला “आपुन आ गयेला है #testednegative” असं भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडिओत त्याने पांढरा आणि लाल पट्ट्यांचा स्वेटशर्ट परिधान केला आहे आणि गॉगलही लावला आहे.
गोविंदा सोबतच कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, नीतू सिंग हे कालाकार करोनातून बरे झाले आहेत. तर अक्षय कुमार, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, भूमी पेडणेकर, नगमा हे कलाकार सध्या करोनाबाधित आहेत. अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ आणि विकी कौशल, भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मिस्टर लेले’ या दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण सध्या थांबवण्यात आलं आहे.