गेल्या वर्षभरापासून करोनाने संपूर्ण देशात धुमाकुळ केला आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळे करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. सध्या तो होम क्वारंटाइन आहे.

ज्युनिअर एनटीआरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही करोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा,” अशा आशयाचे ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

ज्युनिअर एनटीआर आधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अल्लु अर्जुन, पवन कल्याण, राम चरण सारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती.

लवकरच ज्युनिअर एनटीआरला ‘RRR’ या चित्रपटात पाहता येणार आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर सोबत राम चरण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आहेत. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारत आहे. तर राम चरण हा अल्लुरी सिताराम राजू ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे अनेक कलाकार यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० भाषांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.