मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर लगेचच निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यात आक्टोबर अखेरपर्यंत सर्वदूर पाऊस कोसळत होता. दरम्यान, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ७७.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तसेच १ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान देशात ११७.८ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत ७९.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. म्हणजेच देशात ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागातून १० ऑक्टोबरला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देशातून माघार घेतली. काही दिवसांतच अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाची, तर बांगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. याचाच प्रभाव म्हणून राज्यात अनेक भागात पाऊस कोसळला. मुबंईसह विदर्भातही पावसाचा जोर होता.

दरम्यान, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ७७.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तेथे २३८.९ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत ११८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. म्हणजेच येथे १०१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात ७५.८ मिमी पावसाची नोंद झाली. तेथे या कालावधीत ७९.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. येथे ५ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. त्यानंतर विदर्भात ६९.९ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत येथे ५९.२ मिमी पाऊस पडतो. म्हणजेच येथे १८ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. याचबरोबर मराठवाड्यात ८०.६ मिमी पाऊस नोंदला गेला. तेथे ७५.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते.

पुढील तीन – चार दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरण राहील. पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशीव, नांदेड या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.