मुंबई: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून मुसळधार पाऊसामुळे सुमारे १४ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.शेतीच्या नुकसानीचेही तातडीने पंचनामे करावेत आणि सरकारच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीच्या सूचन दिल्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसात आतापर्यंत २१ जणांचे बळी गेले असून १० जण जखमी आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, दरड कोसळून किंवा घर पडून झालेल्या दुर्घटानांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. पुरामुळे सुमारे दीड हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले असून त्यामध्ये ठाणे जिह्यात ६१०, पाळघरमध्ये ५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पालघर येथे मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथक पाठविण्यात आले असून तेथील अंदाजे १२० लोकांना स्थानिक व अग्निशमन दलाच्या मदती सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सावंतपाडा येथून ४४ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्याचप्रमाणे वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, कोदवली आणि बावनदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच सावित्री आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने जांभूळपाडा आणि बदलापूर या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. नांदेड जिह्यातील मुखेड येथे आतापर्यंत २९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. राज्यातील सुमारे १४ लाख एकरवरील पिकांना फटका बसल्याची माहिती प्रथमदर्शनी हाती आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. अजूनही पावसाचा जोर ओसरले नाही. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत पथक ( एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक (एसडीआरएफ) तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेचे आणि समन्वयाचे आदेश देण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यता अतिवृष्टी होत आहे. वेध शाळांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना पावसाबाबत दर तीन तासांनी सतर्कतेचे (अलर्ट) संदेश देण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यातील पावसाचा जोर आहे. त्यामुळे विविध प्रकल्पातून होणारा विसर्ग यावर संनियंत्रण करण्यात येत आहे. यासाठी शेजारच्या राज्यातील प्रकल्पांबाबतही पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय राखण्यात येत आहे. त्या राज्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः हिप्परगी मधून अधिकचा विसर्ग व्हावा यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तेलंगणाच्या जलसंपदा विभागांशीही समन्वय साधण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील परिस्थितीवर सातत्यपूर्ण लक्ष
अतिवृष्टीचा फटका मुंबई महानगराला सर्वाधिक बसला आहे. कालपासून पाऊस सुरूच आहे. त्यातच आज काही ठिकाणी ३०० मिलीमीटरहून अधिक म्हणजेच अतिवृष्टीच्या मानकांहून अधिक पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचले होते.
राज्यातील अनेक नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे काही नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. मुंबईत मात्र मिठी नदीने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे सुमारे चारशे जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई शहरातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मिठी नदी परिसरालाही भेट दिली आहे. मिठी नदीतील गाळ उपसण्यात कुचराई झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत आता सुरस आणि चमत्कारिक गोष्टीही बाहेर येत आहेत. यावर मुंबई महापालिकेला आता पुन्हा गाळ काढावा लागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून सांगण्यात आले.