मुंबई : मुंबईत वडाळा ते गेट वे ऑफ दरम्यान भुयारी मेट्रो, मुंबईकरांसाठी २३८ वातानुकूलित उपगनरीय गाड्यांची खरेदी, बदलापूर-कर्जत दरम्यान तिसरी व चौथ्या रेल्वे मार्गिकांची उभारणी, आसनगाव-कसारा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका आणि पनवेल ते वसईदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे क्षेत्र (कॉरिडॉर) अशा सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आगामी काळात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून महापालिका, नगरपालिकांवर निधी वर्षाव करतनाच निवडणुकीच्या तोंडावर नव्या प्रकल्पांच्या समारंभाचे नारळ फोडून मतदारांना खुश करण्यासाठीही सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
वडाळा- गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो
सुमारे २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चाच्या आणि १७.५१ किलोमीटर लांबीच्या आणिक डेपो – वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही मुंबई मेट्रो मार्गिका (वडाळा-ठाणे-कासारवाडवली-मेट्रो ४) चा विस्तार भाग आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभागआणि ९१६ कोटी ७४ लाक रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळविण्याकरिता विनंती करण्यात येणार आहे.
पुणे मेट्रोच्या दोन नवीन स्थानकांना मंजुरी
पुणे शहरात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन दोन मेट्रो स्थानके उभारणीमुळे आणि बोगद्याची लांबी अंदाजे ४२१ मीटर ने वाढविल्यामुळे येणाऱ्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली.
मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्या
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत उपनरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी २३८ वातानुकुलीत रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के म्हणजेच २ हजार ४१३ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.
१३६ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रस्तावित १३६ किलोमीटर लांबीच्या व १४ हजार ९०७ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्प खर्चाचा ५० टक्के म्हणजेच ७ हजार ४५३ कोटी ७३ लाख रुपयांचा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे.
पुणे ते लोणावळा दरम्यान नव्या रेल्वे मार्गिका
पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सुमारे ६३.८७ किलोमीटर लांबीच्या व १७ स्थानके असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणार आहे. याशिवाय विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास मान्यता देण्यात आली.