गुजरात निवडणुकीत भाजपा स्पष्ट बहुमतासह विजयी मार्गाकडे वाटचाल करत आहे. गुजरातमध्ये भाजपा १५७ जागांसह आघाडीवर आहे. तर, काँग्रेसचे केवळ १६ उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे ३९ तर, भाजपाचे २७ उमेदवार तिथे आघाडीवर आहे. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “गुजरात, हिमाचल आणि पोटनिवडणुकीचे निकालसमोर येत आहेत. विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आतातरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. तसेच, महाराष्ट्रात एका लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊद्या,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : ‘आप आणि भाजपाचं साटंलोटं’ म्हणणाऱ्या राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काही लोक संपादक आहेत की पादक…”

गुजरातमध्ये भाजपा तर हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावर आदित्य ठाकरेंनी सांगितलं, “लोकशाहीत एका राज्यात एक, दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष आला. आता वेळ आली आहे, महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची. कारण, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आलं आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, ते अजून झाल्या नाहीत. आता एवढा मोठा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका घेण्यास काय हरकत नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray challenge bjp and shinde group get maharashtra election after gujarat election win ssa