मुंबई: शिवाजी पार्क मैदानावरील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा दादर येथून उपेंद्र पावस्कर (३५) याला अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे ओळख पटवून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने यापूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पोस्टरचीही विटंबना केल्याचा संशय आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. अज्ञात इसमाने पुतळ्यावर लाल रंग (ऑईल पेंट) फेकला होता. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अटक

या प्रकऱणाचे राज्यभर पडसाद उमटले होेते. संतप्त शिवसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात गर्दी केली होती. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली होती आणि आरोपीला २४ तासांत अटक करण्याची मागणी केली होती. गृहराज्य मंत्री योगेश कदम हेही पोलिसांकडून तपास कामाचा आढावा घेत होते. शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे रात्री उशीरा उपेंद्र पावस्कर (३५) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. तो दादर येथे वास्तव्यास आहे. त्याने हा प्रकार का केला त्याचा तपास पोलीस करत आहेत.

उध्दव ठाकरेंच्या बॅनरचीही विटंबना ?

आरोपी दादर खेड गल्ली येथे वास्तव्यास असून त्याच्या या कृतीमागील हेतूबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, याआधीही अटक आरोपीने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरची विटंबना केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

तणाव निवळला, पोलीस बंदोस्त कायम

आरोपीच्या अटकेमुळे तणाव निवळला आहे. उध्दव ठाकरे यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.