मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी असलेला हार परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री रुची गुज्जरची एका निर्मात्याने २४ लाखांची फसवणूक केली. सोनी टीव्हीमधील मालिकेत, तसेच सिनेमात पैसे गुंतविण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी निर्माता करण चौहान याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रूची गुज्जर (२६) ही जोगेश्वरीत राहते. २०२३ मध्ये तिची करण चौहान (३६) याच्याशी ओळख झाली होती. त्याने सोनी टीव्हीवर एक दैनंदिन मालिका (डेली सोप) तयार करत असल्याचे सांगितले. या मालिकेत गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार रुचीने २४ लाख रुपये गुंतवले होते.
दरम्यान, अभिनेत्रीने सोनी टीव्ही मध्ये नाझिया शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्या मालिकेला मंजुरी मिळाली नसल्याचे समजले. याबाबत रुचीने करण सिंग याला जाब विचारला. तेव्हा त्याने माफी मागितली. परंतु हे पैसे मालिकेत नाही तर ‘सो लॉंग व्हॅली’ या आगामी थ्रीलर सिनेमात गुंतविल्याचे त्याने सांगितले. त्या सिनेमातून मिळणारा मोठा फायदा देईन, तसेच चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव नमुद करण्याचे आश्वासन करण चौहानने दिले होते. त्याला रुची तयार झाली.
चित्रपट प्रदर्शित, पण अभिनेत्रीला डावलले
‘सो लॉंग व्हॅली’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण त्यात रुचीचने नाव नव्हते. करण चौहान याने हा सिनेमा विकला होता. त्यात गुंतवलेले पैसे आणि नफा तिने करणकडे मागितला. तेव्हा मात्र करण चौहानने तिला शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी करण सिंगविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३५२, २५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे रुची गुज्जर ?
रुची गुज्जर (२६) मूळची राजस्थानमधील असून सध्या तिने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. फ्रान्स येथे २०२५ मध्ये झालेल्या कान्स फिल्म सोहळ्यात तिने सोनेरी लेहंगा आणि गळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले पेंडंट्सचा हार (नेकलेस) परिधान केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती.