मुंबई : ‘गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील भाजप – शिंदे राजवटीने मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रोखण्याचे प्रयत्न केले. त्यांना जितकी पराभवाची भीती, तितकीच शिक्षणाचीही भीती वाटते. त्यांची बहुतेक मुले परदेशात शिकतात किंवा परदेशात व्यवसाय करतात, मात्र हे आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे भीती दाखवून लढण्यात व्यस्त ठेवतात. त्यांना शिक्षण, शैक्षणिक सुधारणा आणि त्यातील बदलांची भीती वाटते, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत केलेला खोटा प्रचार उघडे पाडेल, त्यावरच त्यांचे निवडणूक जिंकणे अवलंबून असते’, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा

निवडणुकीला रातोरात स्थगिती, मतदारयादीवर आक्षेप, राजकीय आरोप – प्रत्यारोप, न्यायालयातील लढाई, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आदी विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक लांबणीवर पडली. अखेर तब्बल दोन वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. रविवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान आणि बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विजय प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी कंबर कसली असून विविध माध्यमातून प्रचार सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनीही नोंदणीकृत पदवीधर मतदारांना पत्र पाठवून युवा सेनेच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पत्रातून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे पत्र युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन नोंदणीकृत पदवीधर मतदारांना देत आहेत.

‘मुंबई विद्यापीठातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत’, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमुद केले आहे.

हेही वाचा >>> तबेल्यांच्या स्थलांतरास विरोध; आरे वसाहतीमध्ये जागा देण्याची दूध उत्पादक संघटनेची मागणी, पालिकेचे सरकारला पत्र

ठाकरे गटाची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण १० जागांसाठी २८ उमेदवार उभे आहेत.  यापैकी युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा १ आणि ३ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिंदे गटाची युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून एकाही जागेसाठी उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाची अधिसभा निवडणूक ही थेट युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यात होणार आहे. तर अपक्ष उमेदवारांची मतेही निर्णायक ठरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray slams shinde fadnavis government over mumbai university senate election mumbai print news zws