“मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

“मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा
राहुल नार्वेकर व अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. त्यांच्याविषयी मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच नार्वेकरांचं कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. अशा लोकांवर आम्ही देखील लक्ष ठेवून असतो, असं नमूद केलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, “राहुल नार्वेकर पूर्वी शिवसेनेत होते. त्यावेळी माझ्या कानावर आलं होतं की आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी आदित्य ठाकरेंना कायद्याचं बरंच ज्ञान आदित्य ठाकरे यांना देण्याचा प्रयत्न केला. आम्ही देखील अशा लोकांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मला मावळ लोकसभा मतदारसंघात अभ्यासू व सुशिक्षित उमेदवार पाहिजे होता.”

“दुर्दैवाने मोदींची लाट असल्याने मी-मी म्हणणारे पराभूत झाले”

“लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुल नार्वेकर यांना विनंती केली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने मी-मी म्हणणारे पराभूत झाले. त्यात आमचे उमेदवार राहुल नार्वेकरही पराभूत झाले,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“राहुल नार्वेकर फार हुशार आहेत”

अजित पवार पुढे म्हणाले, “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलं मी उमेदवार होईन पण मला अपयश आलं तर मला कुठं तरी सदस्य केलं गेलं पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं. तेथे त्यांनी उत्तम काम केलं. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “विरोध का करता, जीवे ठार मारू”; एकनाथ शिंदेंच्या ‘पीए’वर शिवसेना नेत्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप

“नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळ जातात”

“मला एका गोष्टीचं खूप कौतुक आहे. राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या खूप जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना आपलसं केलं. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपात गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना आपलंसं करून टाकलं. त्यांनी कुठलीच हयगय केली नाही. आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं. नाहीतर त्यांचं काही खरं नाही,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar sarcastic remarks on rahul narvekar during assembly session pbs

Next Story
राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी