लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले. त्यानंतरही वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अर्थात अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर या लढ्याच्या निकालाचा मुद्दा शांत झालेला नाही. अमोल किर्तीकरांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाल्यानंतर मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून व मविआकडून केला जात आहे. मात्र, असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची भूमिका महायुतीनं घेतली आहे. त्यात आता संबंधित मतमोजणी केंद्रात एक मोबाईल नेण्यात आला होता आणि तो रवींद्र वायकरांशी संबंधित व्यक्तीकडे होता असा दावा केला जात आहे. यासंदर्भात आता नुकतेच काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत गेलेले नेते संजय निरुपम यांनी नव्याने भूमिका मांडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या वनराई पोलीस स्थानकात मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यापैकी एक व्यक्ती रवींद्र वायकर यांची नातेवाईक असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, यातूनच मतमोजणी केंद्रावर गैरप्रकार होऊन वायकरांना विजयी घोषित करण्यात आल्याचा आरोप मविआकडून केला जात आहे. राहुल गांधींसंह अनेक नेत्यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत.

मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा, एक आरोपी नवनिर्वाचित खासदाराचा नातेवाईक

दरम्यान, हे आरोप चुकीचे असून रवींद्र वायकरांचा विजय इव्हीएम मशीनमधल्या मतांच्या संख्येमुळे नसून पोस्टल मतांच्या मताधिक्यामुळे झाल्याचा दावा गेल्याच महिन्यात तब्बल १९ वर्षांनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत घरवापसी झालेल्या संजय निरुपम यांनी केला आहे.

निरुपम यांनी मांडलं पोस्टल मतांचं गणित

संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना पोस्टल मतांचं गणित मांडलं. “पोस्टल बॅलेटमधील मतांनुसार १५५० मतं रवींद्र वायकरांना मिळाली होती आणि १५०१ मतं अमोल किर्तीकरांना मिळाली होती. ती मतं मुख्य ईव्हीएम मोजणीत समाविष्ट केली जात नाहीत. ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यात पोस्टल मतांची बेरीज केली जाते. त्यामुळे ईव्हीएममधील मतमोजणीमध्ये किर्तीकरांना एक मत जास्त होतं. त्यात पोस्टल मतं समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार शेवटी १५५० मतं रवींद्र वायकरांची जमा झाली आणि १५०१ मतं किर्तीकरांची जमा झाली. म्हणून ते ४८ मतांनी पराभूत झाले”, असं संजय निरुपम म्हणाले.

रवींद्र वायकरांना मिळालेल्या निर्णायक ४८ मतांपैकी ४७ मतं…

“जेव्हापासून हा निकाल लागलाय, तेव्हापासून ठाकरे गटाकडून असा प्रचार केला जातोय की यात घोटाळा झाला आहे. रवींद्र वायकरांना प्रशासनान जिंकवून दिलं असं म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन वेळा पुनर्मोजणीची मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ती झाली. जर त्याला नकार दिला असता तर तुम्ही म्हणू शकले असता की प्रशासनानं पदाचा गैरवापर करून सत्ताधारी उमेदवाराच्या विजयासाठी काम केलं”, असंही निरुपम म्हणाले.

“मतमोजणी केंद्रात नेलेला मोबाईल नेमका कुणाचा?”

दरम्यान, मतमोजणी केंद्रामध्ये नेण्यात आलेला मोबाईल कुणाचा होता? मोबाईल नेणारा व्यक्ती खरंच वायकरांचा साला होता का? यांचा तपास व्हावा, असं निरुपम म्हणाले आहेत. “वनराई पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. एक व्यक्ती मोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन गेला होता. हा चौकशीचा विषय नक्कीच आहे. हा मोबाईल रवींद्र वायकरांच्या साल्याचा होता की नाही याची चौकशी व्हायला हवी. त्याचा मोबाईल नसूही शकतो. जर असेल तर त्यात तथ्य आहे. मग त्यानुसार जी काही कारवाई असेल, ती व्हायला हवी. हा मोबाईल कुणाचा आहे हे आधी पाहायला हवं”, असं ते म्हणाले.

“मोबाईलचा वापर करून ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आलं, त्या मोबाईल फोनवर ओटीपी आला असे दावे केले जात आहेत. या देशात कोणतंच ईव्हीएम मोबईलने ऑपरेट होत नाही. मग मोबाईलवर ओटीपी कसा येईल? ईव्हीएम मोजणीसाठी उघडताना तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना मेसेजेस येतात की अमुक इतक्या ईव्हीएम उघडल्या आहेत. त्यामुळे मविआकडून रवींद्र वायकरांविरोधात हा अपप्रचार केला जात आहे”, असंही संजय निरुपम यावेळी म्हणाले.