मुंबई : “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत” अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) नेत्यांनीही शेलारांवर टीकेची झोड उठविली.

अमराठी माणसाने घाबरण्याचे कारण नाही, पण त्यानेही मराठी माणसाला डिवचू नये, असे सांगताना शेलार यांनी मराठीसाठी झालेले आंदोलन आणि पहलगाम हल्ल्याची तुलना केली. या दोन घटनांची तुलना खरे तर करता येत नाही, मात्र अमराठींना होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारांमुळे उद्विग्नता येते, असे ते म्हणाले. इंग्रजांची रणनीती तोडा आणि राज्य करा, अशी होती. आता भीती पसरवा आणि मते मिळवा, अशी काही पक्षांची रणनीती असल्याची टिप्पणी त्यांनी केली. दोन भाऊ व कुटुंबे एकत्र आली, तर आनंदच आहे. हिंदू जीवन पद्धतीमध्ये कुटुंबाचे महत्त्व मोठे आहे, असे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल सांगायचे, तर एकाचे भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचे अप्रासंगिक होते व मेळाव्याचा कार्यक्रम अवास्तव होता, अशी टीकाही शेलार यांनी केली.

शेलार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागले. तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचे सांगता. पण, पहलगामचे चार दहशतवादी अजून सापडलेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. तर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात ‘रडण्याचा कार्यक्रम’ जाहीरपणे सुरू करावा,’ असा टोला लगावला.

मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची व संस्कृतीची चिंता भाजपनेच केली आणि भाजपच करेल. तुमच्या मुलांनी तीन भाषा शिकाव्यात आणि राज्यातील अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये? – आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री

पहलगाममध्ये पर्यटकांना ज्या अतिरेक्यांनी मारले, त्यांना पकडले का? महाराष्ट्रात राहायचे, तर मराठी बोलावेच लागेल. भाजपचे राजकारण मतांसाठी आहे. मराठीबाबत चुकीचे बोलणार असाल, तर गाठ मराठ्यांशी आहे. – अविनाश जाधव, मनसे नेते