मुंबई : भाजपने महाराष्ट्रासह देशभरात आणीबाणीविरोधात आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ अवघड आहे. आणीबाणीच्या काळात वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते. त्यामुळे नांदेडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नसल्याचे चव्हाण यांनी केल्याचा दावा काही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र अद्याप नांदेड जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे आणि मला आमंत्रण नसल्याचे चव्हाण यांनी ‘ लोकसत्ता ’ ला सांगितले. मात्र पक्षाच्या आदेशानुसार आणीबाणीविरोधातील कार्यक्रमाचे आयोजन नांदेडला २५ जूननंतर करणार असून चव्हाण यांना आमंत्रित करणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर यांनी स्पष्ट केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भाजपने देशभरात आणीबाणीविरोधात हजारो कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रदेश, जिल्हा, तालुका आणि मंडल स्तरापर्यत पक्षाकडून आणि नेत्यांनी विविध प्रकारे आणीबाणी निषेधाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्याख्यान, चर्चा, परिसंवाद आदी माध्यमातून जनमानसात जाऊन आणीबाणीविरोधात जनजागृती करावी व निषेध करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपचे नांदेडमधील काही स्थानिक पदाधिकारी चव्हाण यांच्याकडे गेले असता त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले, असा या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रातही हजारो नागरिकांवर अत्याचार झाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आणून हजारो राजकीय नेते व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, प्रसिद्धीमाध्यमांवर निर्बंध आले आणि विविध प्रकारे नागरिकांच्या हक्कांची गळचेपी झाली. या काळात शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे प्रमुख होते. आणीबाणीविरोधातील भाषणांमध्ये इंदिरा गांधी, संजय गांधीबरोबर चव्हाण यांच्याही नावाचा उल्लेख होण्याची किंवा भाजप नेत्यांकडून टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चव्हाण यांनी कार्यक्रम टाळण्याची भूमिका घेतली असावी, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे

म्हणणे आहे. त्यांनी ते प्रदेशच्या नेत्यांपर्यंत पोचविले आहे.त्याचबरोबर राज्यभरात असलेला मूळ भाजपचे व काँग्रेस किंवा अन्य पक्षांमधून आलेले नेते हा वाद नांदेडमध्येही असून अमर राजूरकर यांना शहराध्यक्ष केल्याने मूळ भाजपमधील पदाधिकारी व नेते नाराज आहेत. त्यामुळे देशभरात होत असलेला आणीबाणीविरोधातील कार्यक्रम नांदेडमध्ये होणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि भाजपच्या अन्य कार्यक्रमांमध्ये अन्य पक्षांमधून आलेले नेते सहभागी होण्याचा प्रयत्न काही प्रमाणात करीत आहेत. मात्र पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम, निवडणुकीत तयारी व अन्य जबाबदारी पक्षाच्या मूळ नेत्यांनी घ्यायची आणि बाहेरुन आलेल्या नेत्यांना मात्र पक्षातील जबाबदाऱ्या व सत्तापदे मिळतात, याबाबत त्यांची नाराजी आहे.

यासंदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना ते म्हणाले, ‘ आणीबाणीविरोधात अद्याप कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिल्ह्यात करण्यात आलेले नसून मला कोणीही स्थानिक पदाधिकारी भेटलेले नाहीत, मला निमंत्रणही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणालाही मी उपस्थित राहणार नाही, हे सांगण्याचा प्रश्नच नाही.‘ मात्र शहराध्यक्ष राजूरकर यांनी पक्षाच्या आदेशानुसार आणीबाणीविरोधात कार्यक्रमांचे आयोजन नांदेडमध्ये करणार असल्याचे सांगितल्याने त्यास चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ जुळणार का आणि ते इंदिरा गांधींसह अन्य नेत्यांवर आणीबाणीसाठी टीका करणार का, अशी चर्चा भाजपमध्ये सुरु आहे.