Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. पावसानेही हजेरी लावल्याने त्यांची तारांबळ उडाली. मात्र, त्या परिस्थितीतही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम होता. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलक नाचत जल्लोष करत आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निर्णायक आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगी आणि झांजेच्या झंकारात आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आंदोलनाचा सूर जरी गंभीर असला तरी या जल्लोषामुळे ठिकठिकाणचे वातावरण उत्साहवर्धक झाले आहे. उपोषणाला सुरुवात करतानाच जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना केले.

रेल्वे स्थानकांमध्ये लोकल ट्रेन येताच नाहक किंकाळ्या फोडणे सुरू असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. रेल्वे स्थानकातील आंदोलकांच्या गर्दीमुळे सामान्य प्रवाशांना चालणेही मुश्किल झाले आहे. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनाच्या पहिल्या दिवशी गैरसोयींचा सामना करावा लागला. अपुरी शौचालये व खाद्य पदार्थांची बंद दुकाने यामुळे त्यांचे हाल झाले. मात्र, रात्री स्थानक परिसरातील काही दुकानांमध्ये खाद्य पदार्थांची विक्री सुरू झाली. तसेच, आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाच्या फलाटावर रात्र काढली. मात्र, या गैरसोयींमुळे आंदोलकांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नसून त्याउलट त्यांच्या उत्साहात वाढ झाली आहे.