मुंबई : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन या मदतकार्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मध्ये जमा करण्यात येणार आहे. ही मदत ऐच्छिक स्वरुपाची असून त्याबाबत कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भयावह पूरपरिस्थिती निर्माण झाली होती व त्यात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता, आर्थिक नुकसानासह जीवितहानी झाली. त्यामुळे शासनाच्या अधिन सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने एक दिवसाचे वेतन या मदतकार्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये जमा करावे, असे आवाहन सरकारने केले होते.
आता मुंबई महापालिकेचे अ, ब, क, ड या सर्व श्रेणीतील कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या नोव्हेंबर महिन्यातील पगारातून एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या कामगार विभगााने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले. मुंबई महापालिकेचे सुमारे ९० हजाराहून अधिक कामगार, कर्मचारी आणि अधिकारी आहेत.
मदतकार्याला एक महिना विलंब
राज्य सरकारने मदतकार्यासाठी ऑक्टोबर, २०२५ च्या वेतनातून निधी वसूल करण्याबाबत आवाहन केले होते. मात्र महानगरपालिकेच्या वेतन कार्यप्रणालीचा कालावधी व इच्छुक कर्मचाऱ्यांचे संमतीपत्र प्राप्त करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेता एक दिवसाचे वेतन महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या वेतनातून ऑक्टोबर २०२५ ऐवजी नोव्हेंबर २०२५ च्या वेतनातून कपात करून मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येणार आहे.
मदत ऐच्छिक
मुंबई महानगरपालिकेतील इच्छुक कामगार/कर्मचारी यांच्याकडून संमतीपत्र घेऊन, त्यांचे एक दिवसाचे वेतन (मूळ वेतन महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करून) कपात करून राज्यात अतिवृष्टीमुळे उद््भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये देणगी स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याकरीता १३ नोव्हेंबरपर्यंत संमतीपत्र सादर करावे लागणार आहे. तसेच ज्या कामगार/कर्मचाऱ्यांची मासिक वेतनातून रक्कम वसूल करण्यास हरकत असेल, त्यांनी तशा आशयाचे वैयक्त्तिक पत्र संबंधित कार्यालयाच्या आस्थापना अधिकाऱ्यांकडे सादर करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, सोलापूरसह मराठवाड्यातील पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिक आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
