मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. त्यामुळे मुंबई, पुण्यातून कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यावर्षी गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेवरून ३०२ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. परंतु, या रेल्वेगाड्यांचे आरक्षण करताना, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल. आरक्षण प्रणाली बंद राहणार असल्याने, प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे किंवा तिकीट काढणे अशक्य होणार आहे.
मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सुरुवातीला २५० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. त्यानंतर, मध्य रेल्वेने आणखी ५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचे घोषित केले. तसेच आणखी दोन सेवा वाढवून दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीचा विस्तार केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या ३०२ वर पोहचली आहे. आरक्षण प्रणाली बंद कधी राहील प्रवासी आरक्षण प्रणालीमधील (पीआरएस) ‘सिस्टम डिस्क डीफ्रॅगमेंटेशन’ आणि ‘सिस्टम पॅरामीटर ट्यूनिंग’ या कामासाठी आरक्षण प्रणाली बंद करण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११.४५ वाजल्यापासून ते रात्री ३.४५ वाजेपर्यंत आरक्षण प्रणालीचे काम बंद राहील.
कोणत्या सेवा उपलब्ध नसणार
आरक्षण प्रणाली बंद राहिल्यामुळे तिकीट आरक्षण, तिकिट रद्द करणे, चौकशी सेवा, चालू आरक्षण, इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस), तिकीट परतावा, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन या सेवा उपलब्ध नसतील. तथापि, सध्याच्या परतावा नियमांनुसार परतफेडीसाठी तिकीट जमा पावती (टीडीआर) देण्यात येईल.
दर मिनिटाला १.५० लाख तिकिटे काढणे शक्य होणार
सणासुदीच्या काळात किंवा उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वेची तिकिटे काढताना प्रचंड गैरसोय होते. भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस)द्वारे तिकीट आरक्षण करताना अनेक वेळा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. एकाच वेळी अनेक तिकिटे काढली जात असल्याने, यंत्रणेवर प्रचंड भार येतो. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यास खूप प्रतीक्षा करावी लागते. तसेच तिकीट रद्द होणे, पैसे कापले जातात, परंतु तिकीट मिळत नाही आदी समस्यांचे निराकरण करण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत पीआरएस यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. त्यानंतर दर मिनिटाला १.५० लाख तिकिटे काढणे शक्य होईल.
सध्या प्रति मिनिटाला किती तिकिटे काढली जातात ?
डिसेंबर २०२५ पर्यंत सुधारित प्रणालीद्वारे दर मिनिटाला १.५० लाख तिकिटे काढणे शक्य होणार आहे. मात्र, सध्या प्रति मिनिटाला सुमारे ३२ हजार तिकीट काढण्याची यंत्रणेची क्षमता आहे. प्रवासी आरक्षण प्रणाली वारंवार अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे तिकिटे काढण्याची कृती वेगात होते. २२ मे रोजी एका मिनिटात ३१,८१४ तिकिटे काढली होती.