मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उच्च शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या कामगिरीचा आलेख विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे विद्यापीठांच्या क्रमवारीवर परिणाम झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता तासिका तत्त्वाऐवजी कंत्राटी प्राध्यापकांची नेमणूक करण्याचा उतारा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शोधला आहे.

मात्र, या कंत्राटी प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी विद्यापीठांवरच ढकलण्यात आली असून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वेतनाचा खर्च भागवण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत देण्यात आली आहे.

एनआयआरएफमध्ये गतवर्षी पहिल्या १०० मध्ये असलेल्या सर्वच शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत लक्षणीय घसरण झाली. पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत झालेली घसरण म्हणजे फारच शरमेची बाब ठरली. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एनआयआरएफ क्रमवारी जाहीर झाल्यानंतर तातडीने विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये घसरण होण्याचे कारण व समस्या शोधण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कुलगुरूंनी क्रमवारीत घसरण होण्यामागे प्राध्यापकांची रिक्त पदे हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले. त्यावर पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून नवे राज्यपाल नियुक्त झाल्यावर हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल, असे कुलगुरूंना सांगण्यात आले. मात्र त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता चंद्रकांत पाटील यांनी तात्पुरता तोडगा काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्त्वाऐवजी कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी, असा तोडगाही त्यांनी सुचवला. त्याचवेळी त्यांचा वेतनाचा खर्च सीएसआरमधून भागवण्यात यावा अशीही सूचना देण्यात आली.

कामगिरीचे अवलोकन करण्याचा सूचना

विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये घसरण होण्यामागे प्राध्यापकांची रिक्त पदे हे महत्त्वाचे कारण असले तरी विद्यापीठाच्या कोणत्या विभागाने किती संशोधन केले. किती पेटंट्साठी नाेंदणी केली, किती विद्यार्थ्यांनी स्टार्टअपची सुरुवात केली अशा अनेक बाबींबाबत विद्यापीठाच्या कामगिरीचे अवलोकन होणे गरजेचे असल्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

विद्यापीठाने काही विभागांमध्ये सुधारणा केल्यास पुढील वर्षी राज्यातील पाच संस्था या एनआयआरएफ क्रमवारीमध्ये पहिल्या ५० मध्ये असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.