मुंबई: उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार होती. मात्र सणासुदीच्या काळात लोकांना घराच्या अनधिकृत बांधकामांबाबत नोटीसा देऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार करू नका. जी कारवाई करायची असेल, ती गणेशोत्सवानंतरच करा. अधिकाऱ्यांनी लोकांना कोणत्याही नोटिसा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी महापालिकेला दिले.
उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी स्थानिकांनी सरकारकडे केली होती. याची दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाई गणेशोत्सवापर्यंत थांबविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, बनावट नकाशे तयार करून बांधकामे केलेल्यांना अभय मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
उत्तर मुंबईतील बांधकामबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ८८४ हद्द कायम नकाशांपैकी १६५ नकाशांमध्ये तसेच नगर भूमापन अधिकारी गोरेगाव यांच्या अभिलेखातील नगर भूमापन चौकशीच्या वेळचे ९ आलेखात छेडछाड झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने अनधिकृत ठरलेली बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. चुकीचे नकाशे बनवून बांधकाम केलेल्यांना अभय मिळणार नाही. मात्र, २०११ पूर्वी ज्यांची बांधकामे आहेत त्यांना नियमानुसार काही सवलती देण्यात येतील. यासाठी गणेशोत्सवापर्यंत महापालिकेने पाडकाम करू नये. त्यानंतर महापालिका कार्यालयात सविस्तर बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.