मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रो, रस्ते, उड्डापूल, सागरी मार्ग, सागरी सेतू, उन्नत मार्गापाठोपाठ आता भुयारी मार्गाचे (बोगदे) जाळे विणले जाणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत कुठे आणि कसे, किती भुयारी मार्ग बांधता येतील, कुठे भुयारी मार्गांची गरज आहे, कुठे असे प्रकल्प व्यवहार्य होतील, याचा अर्थात टनल मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास करण्यासाठी महिन्याभरात मुंबई महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्यांत त्याच्याकडून यासंबंधीचा सविस्तर आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. त्यानंतर भुयारी मार्ग बांधण्याच्यादृष्टीने ठोस पाऊले उचलण्यात येणार आहेत. दरम्यान सल्लागारासाठी दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भुयारी मार्गाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टनल मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीअंतर्गत भुयारी मार्गाचे जाळे विणण्याकरीता सरकारने पालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यी समिती स्थापन केली. यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
या समितीत एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि पालिकेच्या अभियंत्यांचा समावेश करण्यात आला. या समितीने सल्लागाराची नियुक्ती करून कुठे-कुठे भुयारी मार्ग बांधता येतील यासह अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी टनल मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीअंतर्गत सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करावा, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे सल्लागाराची नियुक्ती करण्याबरोबरच अभ्यासाच्या खर्चाची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. तर पुढे भुयारी मार्गांची बांधणी पालिका की एमएमआरडीएच्या माध्यमातून करायची याबाबतचा निर्णय पुढे घेण्याचेही निश्चित करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली, मात्र ही प्रक्रिया काही कारणाने लांबली.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न लक्षात घेता, मुंबईत नवीन रस्ते वा इतर पर्ययी व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागा नसल्याने भुयारी मार्गांचे जाळे तयार करण्याच्या पर्यायाला पुन्हा प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळेच आता पालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सल्लागाराच्या निविदेला ॲम्बर्ग इंजिनीअरिंग आणि माईनहार्ट इंडिया या दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. महिन्याभरात निविदा अंतिम करून सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. सल्लागाराकडून तीन महिन्यांत भुयारी मार्गांच्या जाळ्यासंबंधीचा सविस्तर आराखडा तयार करून घेतला जाईल, असेही गगराणी यांनी सांगितले. हा आराखडा तयार झाल्यानंतरच कुठे आणि किती भुयारी मार्ग बांधले जाणार, भुयारी मार्ग कुठे व्यवहार्य आहे हे स्पष्ट होईल. भुयार मार्गांचे कोणते प्रकल्प पालिका आणि एमएमआरडीएने राबवायचे याचाही निर्णय पुढे होईल, असेही ते म्हणाले.
सध्या मेट्रो ३ (कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे) मार्गिकेच्या माध्यमातून मुंबईकर भुयारी मेट्रो प्रवास करत आहेत. लवकरच ठाणे – बोरिवली आणि ऑरेंज गेट – नरिमन पाॅईंट दरम्यानचा प्रवासही भुयारी मार्गे करता येणार आहे. तर येत्या काळात मुंबईत आणखी काही भुयारी मार्गांची भर पडण्याची शक्यता आहे. हे भुयारी मार्ग नेमके कुठे असतील, किती असतील याची स्पष्टता आराखडा तयार झाल्यानंतरच येईल.