Mumbai CNG Supply Shortage: मुंबई : महानगर गॅसच्या पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईतील सीएनजीचा पुरवठा बाधीत झाला आहे. त्याचा फटका ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पंपानादेखील बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी घरोघरी होणारा पाईप गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचे महागनर गॅसने स्पष्ट केले आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्याने वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनला (सीजीएस) होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबई, ठाण्यातील गॅस पुरवठ्यावर बसला आहे. रविवारी महानगर गॅस लिमिटेडने तांत्रिक बिघाडामुळे गॅस पुरवठा बाधीत झाल्याचे सांगितले.

सीएनजी पंप बंद

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी तसेच सार्वजनिक वाहतूक उपक्रमांच्या बसेस महानगर गॅस पुरवठा करत असलेल्या सीएनजीवर चालतात. पण महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनला वायू पुरवठा खंडित आल्याने मुंबईतील अनेक गॅस पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पंपदेखील बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

घरगुती गॅस सुरू राहील

महानगर गॅस लिमिटेड आपल्या घरगुती (पीएनजी) ग्राहकांना प्राधान्याने गॅस पुरवठा करत असतो. दरम्यान, बिघाड झाला असला तरी घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे. पाइपलाइनमध्ये नेमका काय बिघाड झाला आणि तो दुरूस्त होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बिघाडामुळे पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला महानगर गॅस लिमिटेडने दिला आहे.