मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे. त्याआधीच काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आघाडी होणार की नाही याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पालिका निवडणुकीसाठी तब्बल ११५० हून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यादृष्टीने मोठ्या संख्येने उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाने केल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी योग्य उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे बोलले जात असले तरी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांच्या रांगा लागल्याचा दावा पक्षाने केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तरी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असून आतापर्यंत ११५० हून अधिक अर्ज आले आहेत. मुंबईतील सहाही जिल्ह्यांतून इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी सुरू असून २२७ प्रभागांसाठी प्रभारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सर्व प्रभागांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्याच भूमिकेतून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. परंतु एकत्र लढायचे की आघाडी करायची यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही, यासंदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. परंतु मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
स्वबळ की आघाडी
आघाडी होणार की काँग्रेस स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आघाडी झाल्यास काँग्रेसची ताकद वाढेल व जिंकून येणे शक्य होईल असे काही कार्यकर्त्यांना वाटते. समजात झालेल्या विकेंद्रीकरणाचा फायदा काँग्रेसलाही मिळेल. त्यामुळे जिंकून येण्याची शक्यता वाटत असल्यामुळे इच्छुकांचा प्रतिसाद वाढत आहे, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
