मुंबई: मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मला सत्ता द्या सात दिवसात मराठा आरक्षण देतो, अशी वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच काय झाले? भाजप सरकारला आरक्षणाच्या नावाखाली फक्त मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावायची आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वी केली होती. पण सरकारने या तीन महिन्यांत काहीच हालचाल केली नाही. आता मात्र मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे. मुंबईत वाहतूक व्यवस्थेसह परिस्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे, पण मुंबईतील आजच्या परिस्थितीस भाजप सरकारच जबाबदार आहे. मुंबईतील परिस्थितीसाठी मराठा आंदोलकांना बदनाम करू नका.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत रात्री भेटून चर्चा केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पडून शपथ घेतली होती. शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले. गुलाल उधळला आणि शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलक विजयी भावमुद्रेने गावाकडे परत गेले. आता शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली? असा प्रश्न करत एकनाथ शिंदे आजही सत्तेत आहेत. मराठा समाजाला दिलेला शब्द जर ते पाळू शकत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

मराठा आरक्षणाला काँग्रेस पक्षाचा कालही पाठिंबा होता आणि आजही आहे. हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. सत्तेत भाजप युती असल्याने निर्णय त्यांना घ्यायचा आहे. राजधर्माचे पालन करून सरकारने आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि ते जमत नसेल तर पायउतार व्हावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.