मुंबई : भारतीय सिनेमांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तूर्त तपास करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच वांद्रे पोलिसांना दिले.

स्पॉट बॉय म्हणून काम करणारा अनिल मिश्रा आणि त्याचा मुलगा अभिषेक यांच्यावर चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आणि कॉर्पोरेट प्रायोजकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या दोघांवर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे मिश्रा पितापुत्राच्या याचिकेवर सुनावणी नुकतीच झाली. त्यावेळी, न्यायालयाने याचिकेची दखल घेताना प्रकरणातील मूळ तक्रारदार, आणि पोलिसांना नोटीस बजावली. तसेच, याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्याला स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले.

सरकार पुरस्कृत पुरस्कार सोहळा असल्याचे भासवून या पुरस्कार सोहळ्याला चित्रपट कलाकारांना उपस्थित राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप देखील मिश्रा पिता-पुत्रावर आहे. या बनावट पुरस्कार सोहळ्याला विश्वासार्हता मिळवण्यासाठी दोघांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांची बनावट पत्रे आणि छायाचित्रे वापरल्याचाही पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकाराची माहिती मिळल्यावर भाजप चित्रपट संघटनेचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्याआधारे वांद्रे पोलिसांनी मिश्रा पितापुत्रावर गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांच्यातर्फे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (डीपीआयएफएफ) नावाखाली सुरू असलेला घोटाळा फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आणला.

घोटाळा काय ?

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, बिग एफएम, पीएनबी बँक आणि अनेक राज्य पर्यटन विभागांसारख्या नामांकित कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळवले. बुकमायशोवर महोत्सवाचा प्रचार केला आणि प्रत्येक जोडप्याला अडीच लाख रुपयांपर्यंत तिकिटे विकली.

व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) म्हणून डीपीआयएफएफ या नावाचा वापर करता यासाठी मिश्रा याने केलेला अर्ज यापूर्वी नाकारण्यात आला होता. त्यानंतरही, त्याच नावाने मिश्रा पितापुत्राने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. त्याचप्रमाणे, अभिनेता शाहरुख खान, शाहिद कपूर, अभिनेत्री रेखा, करीना कपूर, आलिया भट्ट यासारख्या सेलिब्रिटींना हा सोहळा अधिकृत दादासाहेब फाळके पुरस्काराशी संबंधित असल्याचे भासवून त्यात सहभागी होण्यास सांगितले आणि त्यांची फसवणूक केली.

मूळ संस्थेकडून दावा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी मिश्रा पितापुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, अशा प्रकारे चित्रपट महोत्सवाच्या नावाचा वापर करून हेतुत: बदनामी आणि निराधार आरोप करून संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता मलिन केल्याबद्दल मूळ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने काही व्यक्तीविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

खोट्या, बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल करून संस्थेच्या, त्यांच्या प्रमुख सदस्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक व व्यावसायिक प्रतिष्ठेला अनावश्यक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या दाव्यात करण्यात आला आहे.