मुंबई : गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळीत एकूण ११३ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. अशा दुर्घटना टळाव्या यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वेळोवेळी विविध सूचना करण्यात येतात. मात्र, अतिउत्साही नागरिक निष्काळजीपणे फटाके फोडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अग्निसुरक्षेचे पालन करावे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. हल्ली फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात येत आहेत. काही फटाके फोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, फटाके फोडण्याच्या अतिउत्साहात अनेक वेळा आगीच्या घटना घडतात. त्यामुळे दिवाळीत सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद होते. गेल्या वर्षी दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात मुंबईत ११३ ठिकाणी आग लागली होती.

मात्र, आजही निष्काळजीपणे रस्त्यांवरच फटाके फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्यावर पादचारी, तसेच गाड्यांची वर्दळ सुरू असतानाही सर्रासपणे फटाके फोडले जात आहेत. झोपडपट्टी परिसरातील गल्ली – बोळातही कोणतीही तमा न बाळगता फटाके फोडण्यात येत आहेत. त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा गरोदर महिला, लहान मुले, वृद्धांना त्रास होत आहे.

तसेच, आगीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीत अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अरुंद रस्त्यावरही फटाके फोडण्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.

दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने दिवाळीपूर्वी फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी, काय सावधगिरी बाळगावी याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच, वेळोवेळी अग्निसुरक्षेचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, बहुतांश झोपडपट्टी भागात निष्काळजीपणे फटाके फोडले जात आहेत.

अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे असून त्याअंतर्गत एकूण ३५ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी शहर विभागात १५, पूर्व उपनगरांत ७ आणि पश्चिम उपनगरांत १३ अग्निशमन केंद्रे आहेत. याव्यतिरिक्त १७ उप अग्निशमन केंद्रे आणि २२ विभाग कार्यालयीन स्तरांवरील अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे मुंबईत आगीच्या घटना घडताच काही क्षणातच अग्निशमन दलाचा ताफा मदतकार्यासाठी दाखल होतो. मात्र, सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढत आहे.

मुंबईत जानेवारी २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत केवळ फटाक्यांमुळे १८२ आगीच्या घटना घडल्या. गेल्या वर्षी दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर २०२४ मधील एकूण ११३ आगीच्या घटनांचा त्यात समावेश आहे. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. अशी परिस्थिती यंदा उद््भवू नये यासाठी अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेबाबत विविध सूचना केल्या आहेत. तसेच, आणीबाणीच्या प्रसंगी दूरध्वनी क्रमांक १०१ / (०२२) २३०८५९९१ /(०२२) २३०८५९९२ / (०२२) २३०८५९९४ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

उडणारे फटाके पेटविण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ?

  • प्रौढांची देखरेख असावी – लहान मुलांना कधीही एकट्याने फटाके उडवू देऊ नका.
  • मोकळी जागा निवडा – घर, झाडे, वीजेच्या तारा आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर असलेली.
  • वाऱ्याची दिशा पहा – वारा जोरात असल्यास फटाके उडवू नका, ते चुकीच्या दिशेने जाऊ शकतात.
  • योग्य स्टँड वापरा – रॉकेटसाठी स्थिर आणि सरळ बाटली किंवा पीव्हीसी पाईप वापरा.
  • सुरक्षित अंतर ठेवा – फटाके उडविण्याच्या जागेपासून सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवा.

फटाके पेटवताना घ्यावयाची काळजी

  • सुरक्षित कपडे घाला सूती कपडे, बंद बूट आणि सुरक्षात्मक चष्मा वापरा.
  • लांब अगरबत्ती / मेणबत्ती वापरा थेट आगपेटी किंवा लायटर वापरू नका.
  • एका वेळी एकच फटाका पेटवा, घाई नको, संयम ठेवा.
  • कधीही वाकून फटाका पेटवू नका रॉकेट पेटवताना नेहमी सरळ उभे राहा.

काही गडबड झाल्यास काय करावे ?

  • फसलेला फटाका परत पेटवू नका, तो १५ मिनिटे तसाच सोडा आणि नंतर पाण्यात टाका.
  • पाणी व वाळू जवळ ठेवा.
  • आग लागल्यास पाणी, वाळू किंवा फायर एक्स्टिंग्विशर वापरून त्वरित आग विझवा.
  • प्राथमिक उपचार – भाजल्यास थंड पाण्याने धुवा; गंभीर जखम असल्यास डॉक्टरांकडे जा.

काय करू नये ?

  • रॉकेट लोकांकडे, प्राण्यांकडे किंवा घरांकडे वळवू नका.
  • फटाके खिशात ठेवू नका.
  • फटाक्यांमध्ये कोणतीही फेरफार करू नका.
  • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, शक्य असल्यास कमी आवाजाचे फटाके वापरा.
  • वृद्ध, लहान मुले व प्राणी यांचा विचार करा.