मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर खड्ड्यांच्या तक्रारींचाही पाऊस पडू लागला. या महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर खड्ड्यांच्या चार हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. तर शुक्रवारी एका दिवसात ३१० तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर पडलेले खड्डे येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी पूर्णपणे भरा असे स्पष्ट निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या वर्षीपासून गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईतील यंत्रणांची ॲड. आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, वाहतूक पोलीस अधिकारी, एमएसआरडीसी अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक उपस्थित होते. याबाबत बोलताना ॲड. आशिष शेलार म्हणाले की, पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ते, द्रुतगती महामार्गा, आतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, यासंदर्भात आज मुंबई महापालिका आयुक्त, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल आठ हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी खड्डे असून या बैठकीत येत्या तीन दिवसांत गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गणपतीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करा

महापालिकेकडून खड्डे भरण्यासाठी वापरले जाणारे ‘मास्टीक तंत्रज्ञान’ वाहतुकीच्या दृष्टीने प्रभावी ठरत असल्याने, परिमंडळनिहाय नियुक्त कंत्राटदारांकडून हेच तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, वाकोला, विक्रोळी, गोरेगाव आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे लक्षात घेऊन, एमएसआरडीसीने तातडीने उपाययोजना कराव्या, अन्यथा महापालिका स्वतः खड्डे भरण्याचे काम हाती घेईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गणपतीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने सर्व कामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तक्रांरीबाबतही शेलार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ज्या ठिकाणी रस्त्यांवरील चर भरण्यासाठी कंत्राटदार नेमलेले नव्हते, तेथे त्वरित कंत्राटदार नेमून काम पूर्ण करा, नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर शाळा, महाविद्यालये आणि रहदारी असलेल्या ठिकाणी त्वरित स्पीडब्रेकर्स, रंबलर्स लावावे, अवैध फेरीवाले, खाद्यपदार्थांच्या अवैध गाड्यांवर कारवाई करा. असे आदेश यावेळी आशिष शेलार यांनी दिले.