मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) नुसार मार्गी लावावा, रहिवाशांना विश्वासात घ्यावे आणि त्यांना २४०० चौ. फुटाचे (कार्पेट एरिया) घर मिळावे या मागण्यांसाठी बुधवारी मोतीलाल नगरमधील रहिवासी आझाद मैदानावर धडकले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत रहिवाशांनी धरणे आंदोलन केले.
गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोतीलाल नगरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाला सायंकाळी चर्चेसाठी बोलावले. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच म्हाडाबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन केली जाईल आणि रहिवाशांचे म्हणणे ऐकले जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासनानुसार बैठक झाली नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) खासगी विकासक म्हणून अदानी समुहाची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनर्विकासासाठी अदानी समुह आणि म्हाडामध्ये करारही झाला आहे. मात्र हा करार बेकायदा असल्याचा आरोप मोतीलाल नगर विकास समितीने केला आहे. उच्च न्यायालयात म्हाडाने विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास मार्गी लावला जाईल असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात पुनर्विकास ३३ (५) नुसार मार्गी लावला जात नसल्याचा आरोप मोतीलाल नगर विकास समितीने केला आहे. तर रहिवाशांना २४०० चौ. फुट कार्पेट एरियाचे, घर तर व्यावसायिकांना २०७० चौ. फुट कार्पेट एरियाचे गाळे देण्याची मागणी रहिवाशांची आहे. या मागणीकडेही म्हाडा आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मोतीलाल नगरमधील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. याच संताप आणि नाराजी राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी बुधवारी मोतीलाल नगर विकास समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
बुधवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत १२०० ते १५०० रहिवाशांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हाडा आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘म्हाडा-सरकारने रहिवाशांचा केला विश्वासघात’, ‘मोतीलाल नगरची जमीन घातली अदानीच्या घशात’ आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार म्हाडाबरोबर बैठक झाली नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर म्हाडावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मोतीलाल नगर विकास समितीचे पदाधिकारी निलेश प्रभू यांनी यावेळी दिला.