मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईमधील वातावरण बदलत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस आणि आता अचानक पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे तापमानात चढ- उतार होत आहेत. त्यातच आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे पुन्हा असह्य उकाड्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी सकाळपासूनच मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, पुढील एक – दोन दिवस वातावरणातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पाऊस सक्रिय झाल्यामुळे मागील काही दिवस मुंबईतील तापमानात घट झाली होती. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. पावसाने पुन्हा ओढ दिल्यामुळे, तसेच दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वमानानुसार, मुबंईतील ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी सकाळपासून मुंबईकर घामाघूम झाले होते. उन्हाचा तडाखा नसला तरी, उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २९.२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात ३०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले असले तरी, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाचा तडाखा कमी असला, तरी आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान, काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील. त्यामुळे उकाड्याचे प्रमाणही कायम राहणार आहे.

आर्द्रतेमुळे होणारे परिणाम

  • उकाडा आणि अस्वस्थता वाढते
  • घामोळ्याचा त्रास

काळजी काय घ्यावी

  • पाणी भरपूर प्यावे.
  • शक्य तेवढे हवेशीर वातावरण ठेवावे.

पावसाची स्थिती काय

मुंबईत पुढील दोन – तीन दिवस पावसाची शक्यता नाही. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पाऊस पडणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.