लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गेली अनेक वर्षे तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेला काही महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे गाड्यांना थांबा देणे शक्य होत नव्हते. मात्र आता या स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे. ‘शिर्डी – सोलापूर वंदे भारत’ला अनुक्रमे कल्याण आणि ठाण्यात थांबा देण्यात आला आहे. तर आता पुढील सहा महिने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना कर्जत, रोहा, पनवेल, लोणावळा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल.

भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेमध्ये अनेक प्रवासीभिमुख सेवा वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रेल्वेमध्ये नाविन्यपूर्ण बदल करण्यास सुरुवात झाली असून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यात ‘अमृत भारत स्थानक विकास योजना’, भारतीय रेल्वेतील ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी प्रवास करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासभाड्यात २५ टक्क्यांची कपात, सामान्य रेल्वेडब्यांतील प्रवाशांना जनआहार योजनेअंतर्गत २० आणि ५० रुपयांमध्ये जेवण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही स्थानकांवर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकांवर सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वेने मुंबई – शिर्डी आणि मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला अनुक्रमे कल्याण आणि ठाणे स्थानकात थांबा दिला आहे. तर आता मध्य रेल्वेने मुंबई – पुणे दोन्ही दिशेकडील डेक्कन एक्स्प्रेस आणि हजूर साहिब नांदेड – पनवेल एक्स्प्रेसला कर्जत येथे शुक्रवारपासून थांबा देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-मुंबई : मंदिरात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

दादर – पंढरपूर एक्स्प्रेस, दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, हुबळी – दादर एक्स्प्रेस, एलटीटी – विशाखापट्टणम एक्स्प्रेस या चार रेल्वेगाड्यांना दोन्ही दिशेकडे आणि एक दिशेकडील कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसला लोणावळा येथे शुक्रवारपासून थांबा देण्यात आला आहे. दोन्ही दिशेकडील एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसलाही शुक्रवारपासून पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे.

दोन्ही दिशेकडील एलटीटी – तिरूवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसला रोहा आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे. तर दोन्ही दिशेकडील दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला रोहा येथे थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा त्याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important trains now stop at karjat panvel roha and lonavala mumbai print news mrj