मुंबई : दिल्लीनंतर आता उबरची कॅराव्हॅन सेवा पुणे आणि मुंबईतही सुरू होणार आहे. स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह, मायक्रोवेव्ह, छोटा फ्रीज, पलंग अशा सुविधांनी सज्ज असलेल्या या गाडीत धावत्या हाॅटेलचा अनुभव घेता येणार आहे.
दिल्ली एनसीआरमधील यशानंतर उबरने गुरुवारी आपल्या लिमिटेड-एडिशन इंटरसिटी मोटरहोम्स मोहिमेचा विस्तार मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथे करण्याची घोषणा केली. परगावी प्रवासासाठी या सेवेची पूर्वनोंदणी करता येईल. मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथील प्रवासी, पर्यटकांसाठी १५ ऑक्टोबरपासून ही मोटरहोम सेवा सुरू होईल. त्याचे आरक्षण १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी पर्यटन करण्यासाठी अत्यंत चांगला कालावधी मानला जातो. त्याच दरम्यान अनेक सणउत्सव, लग्नसमारंभ असतात. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले जाते. या कालावधीत कुटुंब, नातेवाइक आणि मित्रासोबत पर्यटनाचा आनंद घेतला जातो. त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मोटरहोम सेवेकडून उबरला अधिक अपेक्षा आहेत. प्रत्येक इंटरसिटी मोटरहोममध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या वाहनांमध्ये चार ते पाच प्रवाशांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था असेल आणि संपूर्ण प्रवासात मदत करण्यासाठी एक चालक आणि एक सहकारी असेल. वाढत्या मागणीमुळे इंटरसिटी मोटरहोम नियोजित प्रवासाच्या किमान ४८ तास आधी आरक्षित करणे आवश्यक आहे.
उबर इंटरसिटीद्वारे बाहेरगावी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्लीमध्ये मोटरहोम्स सुरू केली. या सेवेला पर्यटक, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात या सेवेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. तसेच इतर शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात मोटरहोम्ससाठी चौकशी करण्यात आली. त्यामुळे या मोहिमेच्या विस्तार करण्यात आला आहे. या मोहिमेच्या विस्तारातून देशात रस्ते प्रवास पर्यायांसाठी असलेली वाढती मागणी दिसून येईल. दिल्लीमधील मोटरहोम्स सेवा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे उबरकडून सांगण्यात आले.