मुंबई : पत्नी आणि मुलाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सोमवारी एकलपीठासमोर सुनावणी होणार आहे. साळवी यांनी स्वत: मात्र याचिका दाखल केलेली नाही.

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि मुलाच्या वतीने साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर गुरुवारी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सरकारी वकील उपस्थित राहू न शकल्याने याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. साळवी यांच्या वतीनेही वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याचे सांगून सोमवारी याचिकांवर सुनावणी घेण्याची विनंती न्याायालयाकडे केली. न्यायालयानेही त्यांची ही विनंती मान्य केली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ‘समरूपी’ला उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यावर विजय मानेकडून याचिका मागे

दरम्यान, ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत १४ वर्षांत बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवीं कुटुंबीयांवर आहे. साळवींकडे तीन कोटी ५३ लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप असून त्यांची मूळ संपत्ती अंदाजे दोन कोटी ९२ लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा ११८ टक्क्यांनी जास्त असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.