मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक घेतला जातो. मात्र, शनिवारी (१३ जानेवारी) रात्रकालीन ब्लाॅक घेतल्याने त्याचे पडसाद रविवारी पहाटेपर्यंत जाणवले. रात्रीची शेवटची सीएसएमटी-कसारा लोकल आणि पहाटेची कसारा-सीएसएमटी लोकल रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. चार लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याची प्रवाशांना माहिती नसल्याने त्यांना रात्र स्थानकावर घालवावी लागली. तर, काहींनी पुन्हा कार्यालयाची वाट धरून, कार्यालयात झोपण्याची व्यवस्था केली. ब्लाॅक कालावधीत नियोजित कामे पूर्ण न झाल्याने आणि रेल्वेने सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. परिणामी, काही रेल्वेगाड्या एकाच ठिकाणी दोन ते तीन तास रखडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेतला होता. त्यामुळे लोकल सेवेचे मार्ग बदलून निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यात कसारा लोकल रद्द असल्याची कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे प्रवासी नेहमीप्रमाणे रात्री १०.५० वाजताची सीएसएमटी-कसारा जलद लोकल पकडण्यासाठी स्थानकात आले असता, संबंधित लोकल रद्द झाल्याचे प्रवाशांना कळले. त्यामुळे पुढील कसारा लोकलची वाट बघण्यासाठी थांबले. मात्र रात्री १२.१४ वाजताची शेवटची सीएसएमटी-कसारा लोकलही रद्द केल्याचे समजले. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली. शेवटच्या लोकलवर अवलंबून असलेले प्रवासी गोंधळून गेले. काहींनी स्थानक व्यवस्थापक कार्यालय गाठले असता ते देखील बंद होते. त्यामुळे अनेकांना संपूर्ण रात्र स्थानकात काढावी लागली. ज्यांना शक्य होते, त्यांनी पुन्हा कार्यालय गाठले.

हेही वाचा – VIDEO : विरार लोकलमध्ये सीटसाठी जुगाड, महिला प्रवाशांनी लावले पोस्टर; लिहिले, “नालासोपारा डाऊन लेडीज अन् मुली…”

शेवटची सीएसएमटी-कसारा लोकल रद्द झाल्याने पहाटे ३.५१ वाजताची कसारा-सीएसएमटी लोकलही रद्द झाली. परंतु, ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे प्रवासी दाट धुक्यात, गारठवणाऱ्या थंडीत स्थानकावर आले असता, लोकल रद्द असल्याचे समजले. त्यानंतर तब्बल एक ते दोन तास स्थानकात थांबल्यानंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने प्रवाशांनी प्रवास केला.

शेवटची सीएसएमटी-कसारा लोकल रद्द केल्याची माहिती प्रवाशांना दिली होती. तसेच कसारा येथे नियोजित ब्लाॅक वेळेत पायाभूत कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा – “हा तर ट्रेलर, पिक्चर अजून…”, मिलिंद देवरा यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक विधान

ब्लाॅकमुळे कसारा दिशेकडील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तिकीटधारक रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक महिला प्रवासी स्थानकात कसारा लोकलची वाट पाहत उभ्या होत्या. यावेळी कोणता अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार? पायाभूत कामे करताना, लोकलच्या वेळापत्रकाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. – उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inconvenience due to central railway administration four night and early morning local train cancelled mumbai print news ssb