मुंबई : जैन मंदिराच्या रक्षणासाठी, मशीदींच्या रक्षणासाठी जसे बोर्ड आहे तसेच जैन मंदिरांसाठी सनातन बोर्ड हवे अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी केली असून कबुतरांच्या आणि एकूणच पशू-पक्ष्यांच्या हक्कासाठी येत्या १ नोव्हेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात गाय सुरक्षित नाही, कुत्रे सुरक्षित नाहीत, कबुतर सुरक्षित नाहीत, मठातील हत्ती सुरक्षित नाहीत आणि आता जैन मंदिरेही सुरक्षित नाहीत, असा आरोप निलेश चंद्र विजय यांनी केला.
विलेपार्ले येथील जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केल्यापासून जैन मुनी निलेश चंद्र विजय हे चर्चेत आले आहेत. कबुतरखाने बंद केल्यानंतर त्या विरोधात जैन समुदायाचे नेतृत्व ते करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आयोजित केलेल्या शांती सभेत पालिका निवडणूकीच्या तोंडावर राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.
तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा देण्याचीही घोषणा केली होती. मात्र या घोषणांवरून त्यांनी घुमजाव केले असून राजकीय पक्षाची घोषणा माझ्या श्रावकांनी केली होती. पक्ष चालवण्याइतका मी मोठा नाही. पण आमच्या समुदायाच्या प्रतिनिधीला उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल अशी नवीनच घोषणा त्यांनी आता केली आहे. त्याकरिता राष्ट्रीय सनातन ३६ कौम सेना तयार करण्यात येणार असून जैन धर्माचे सर्व समुदाय त्या उमेदवाराच्या पाठिशी उभे करू असेही त्यांनी म्हटले आहे.
जैन प्रार्थनास्थळे, कबुतरखाने यांच्या रक्षणासाठी स्वतंत्र बोर्ड असावे, अशी मागणी करून त्यासाठी १ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
