मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल – रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जीते स्थानकांवर ‘कवच’ची नुकतीच यशस्वी चाचणी केली. ‘कवच’ कामासाठी निविदा मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये सर्व विभागांमध्ये लोको चाचण्या पूर्ण करणारी मध्य रेल्वे ही पहिली क्षेत्रिय रेल्वे ठरली आहे. यावर्षाच्या सुरुवातीला मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाच विभागांमध्ये सुमारे ४ हजार किलोमीटर मार्गावर ‘कवच’ उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया मंजूर करणारी पहिली क्षेत्रिय रेल्वे म्हणून मान मिळवला होता.
मध्य रेल्वेच्या सर्व पाच विभागांत मार्च २०२५ मध्ये कवच कामांच्या निविदा मंजूर झाल्या. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्या नेतृत्वाखाली कवच कार्यान्वित करण्याचे काम ‘मिशन मोड’मध्ये हाती घेण्यात आले. संपूर्ण रेल्वे नेटवर्कसाठी सविस्तर रेडिओ आणि लिडार आधारित सर्वेक्षण करण्यात आले. तांत्रिक योजना व आराखडे जलदगतीने मंजूर करण्यात आले.
उपकरणांची तपासणी व पुरवठा सुरू करण्यात आला. प्रत्येक विभागात तीन प्राधान्य स्थानकांची निवड करण्यात आली, जिथे कारखाना व साईट ॲक्सेप्टन्स चाचण्या झाल्यानंतर स्थिर कवच प्रणाली बसविण्यात आल्या. याशिवाय, भुसावळ आणि कल्याण लोको शेड्समध्ये इंजिनवर ऑनबोर्ड-कवच बसविण्याचे कामही सुरू करण्यात आले. त्याचबरोबर, सर्व पाच विभागांमध्ये चाचणी, नेटवर्क मॉनिटरिंग आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे काम करण्यात आले. या नव्या क्षेत्रात मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी आतापर्यंत मध्य रेल्वेतील सुमारे ३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कवच कार्यान्वयन आणि संचालनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महाव्यवस्थापकांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी भुसावळ येथे एकात्मिक कवच नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले आणि दुसखेडा स्थानकावरील कवच स्थापनेची पाहणीही केली. भुसावळ विभागातील दुसखेडा, सावदा आणि निंभोरा स्थानकांवर १९ सप्टेंबर २०२५ रोजी कवचच्या लोको चाचण्या सुरू करण्यात आल्या.मध्य रेल्वेवरील पहिल्या लोको चाचण्या १० सप्टेंबर २०२५ रोजी सोलापूर विभागातील बलवणी – केम – धवलस मार्गावर सुरू करण्यात आल्या. १४ सप्टेंबर २०२५ रोजी धर्म वीर मीना यांनी या मार्गावर यशस्वीपणे लोको चाचण्या पार पाडल्या आणि कवच स्थापनेची पाहणी केली. याच दिवशी कुर्डुवाडी येथे कवच सिम्युलेशन लॅब व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही त्यांनी केले.पुणे विभागातील बेलापूर – राहुरी – पाठेगाव मार्गावर; तसेच नागपूर विभागातील पालाचौरी – इकलेहरा – परासिया मार्गावरही स्थिर कवच प्रणालीची उभारणी आणि लोको चाचण्या करण्यात आल्या.
‘कवच’ची माहिती
कवच प्रणाली ही भारतीय रेल्वेची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश सुरक्षितता वाढविणे हा आहे. ही स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून, रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ही प्रणाली रेल्वेची समोरासमोर (हेड-ऑन) किंवा मागून (रिअर-एंड) धडक होण्यापासून वाचवू शकते. याशिवाय, ही प्रणाली धोकादायक स्थितीत (एसपीएडी) सिग्नल तोडून जाणे टाळते. जर लोको पायलटने लाल सिग्नलकडे जाताना गती कमी केली नाही, तर ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते. या प्रणालीमध्ये सिग्नलची माहिती, गतीमर्यादा, हालचालीचा अधिकार यांचे ऑनबोर्ड डिस्प्ले, समांतर रस्ता फाटकावर (एलसी गेट) आपोआप शिट्टी वाजवणे, गती मर्यादित ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करणे इत्यादी वैशिष्ट्येही आहेत.
भारतीय रेल्वे अधिक सुरक्षितता आणि स्वयंचलनासाठीच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून कवच प्रणालीची अंमलबजावणी मिशन मोडमध्ये करत आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे मंडळाने मध्य रेल्वेतील ७३० इंजिनमध्ये कवच बसविण्यास मान्यता दिली. हे बसविण्याचे काम मध्य रेल्वेच्या सर्व लोको शेड्समध्ये सुरू असून, सर्व इंजिनमध्ये ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.