मुंबई : नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाडा येथे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती, तर धक्काबुक्की झाल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर रोखलेल्या नजरेवरूनही मोठी चर्चा रंगली होती. आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे गुरुवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील ५५६ घरांचे चावी वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मांटुग्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे आणि आदित्य ठाकरे एका मंचावर येण्याची शक्यता आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना यावेळी बोलण्याची संधी देण्यात येणार नसल्याचे समजते. बीडीडी चाळ पुनर्विकास हा आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. असे असताना बोलण्याची संधी नसल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई मंडळाकडून ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. ना. म. जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळ आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतात. तर बीडीडी चाळ पुनर्विकास हा आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ते नियमितपणे प्रकल्पाची पाहणी करणे, प्रकल्पाचा आढावा घेणे, रहिवाशांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत होते. त्यामुळे आता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या ५५६ घरांचा ताबा दिला जाणार असल्याने ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. उद्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून त्यांना निमंत्रण पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यांना यावेळी बोलण्यासाठी वेळ दिला नसल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. याविषयी म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले.

गेल्या काही वर्षांपासून नारळी पौर्णिमेच्या दिवशी आदित्य ठाकरे नियमितपणे वरळी गावाला भेट देतात. यंदा नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदेही वरळी गावात पोहोचले. दोघेही एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीबाबत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही घटना ताजी असतानाच आता उद्या दोघे पुन्हा एका मंचावर येण्याची शक्यता आहे.