मुंबई : एक छायाचित्रकार निसर्गरम्य कोकणात एका मुलीची छायाचित्रे टिपतो. या छायाचित्रणादरम्यान छायाचित्रकाराला विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या छायाचित्रामागे नेमके काय गूढ असते ? याची गोष्ट ‘छबी’ चित्रपटातून पाहता येणार आहे. या चित्रपटाचा रंजक ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. हा २५ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
केके फिल्म्स क्रिएशन व उप्स डिजिटल एंटरटेन्मेंटने ‘छबी’ चित्रपटाची निर्मिती केली असून जया तलक्षी छेडा चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अद्वैत मसूरकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार असून ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनयही आपल्याला पहायला मिळणार आहे.
मंगेश कांगणे, प्रशांत मडपूवार यांनी लिहिलेल्या गीतांना रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून अभय जोधपूरकर रोहन – रोहन यांनी गायनाची धुरा सांभाळली आहे. तर सिनेमॅटोग्राफर म्हणून रोहन मडकईकर यांनी काम पाहिले आहे.
एका छायाचित्र स्पर्धेसाठी एका तरूण छायाचित्रकाराला छायाचित्र पाठवायची असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. कोकणात जाऊन एका मुलीची छायाचित्रे काढलेली असतात. प्रत्यक्षात त्या छायाचित्रात कुणीच दिसत नाही. पण त्या छायाचित्रकाराला सदर छायाचित्रात मुलगी दिसत असते. या छायाचित्रामागे काय कहाणी आहे ? ती मुलगी कोण असते? या प्रश्नांची उत्तरे मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत.
निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. तसेच गेल्या काही काळात कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या वेगवेगळ्या गोष्टी चित्रपटांतून समोर येत आहेत. त्यातून कोकणाचा निसर्ग, तिथली माणसे, चालीरिती, भाषा यांचे चित्रण केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर ‘छबी’ चित्रपटही अनोखा व रंजक ठरणार आहे.