मुंबई: मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले आहे. नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.
अतिवृष्टीमुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच, शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली असून, जमिनीची सुपीक मातीही वाहून गेली आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. राज्यातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत जयंत पाटील यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर उल्लेख करत शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याची मागणी केली आहे.
यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवडाभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे, शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून आपण स्वत: अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे.
शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढवला आहे. पुराच्या पाण्यामुळे फक्त पिकेच नष्ट झाली असे नाही तर शेतकऱ्यांची जमीनही खरडून वाहून गेली आहे. नुकसान इतके झाले आहे की शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिरस्थावर होणार नाही असे दिसते. अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे, पण सरकार असे करताना दिसत नाही. हे योग्य नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तात्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने करीत असल्याचे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.