मुंबई: राज्यातील शिक्षणाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी प्रत्येक शाळेमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेच्या व्यवस्थापनात समावून घेण्यात येणार आहे. शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या शाळेच्या सर्वांगिण उन्नतीसाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर जिल्हयात माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याची दखल घेत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाचा प्रयोग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, संस्कार व मूल्यांवरच विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खासगी शाळांतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन, समाजकारण, राजकारण, संशोधन, व्यापार, शेती, उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे राज्यभरात दिसून येते. यासोबतच हे विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठीही योगदान देत आहेत. तसेच शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेऊन अनेक माजी विद्यार्थी शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासातही महत्त्वाचा हातभार लावत असतात. अशा माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते.

अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये माजी विद्यार्थी संघानी आपल्याा शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देतानाच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही जिल्हयांमध्ये शाळा व्यवस्थापन आणि माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून सुरु झालेले हे उपक्रम आता राज्यभरात पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शाळेतील माजी विद्यार्थांच्या सहभागातून शाळांची सर्वार्थाने गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खाजगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून शाळेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.यानुसार

राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करुन माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेच्या गुणवता वाढीबरोबर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती, सौंदर्यीकरण, क्रिडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक अशा शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य, प्रयोग सामग्री उपलब्ध करून देणे.

उच्च शिक्षणाच्या संधी, परदेशातील शैक्षणिक पर्याय यांची मुलांना माहिती देणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि समाजिक उन्नतीसाठी आवश्यक साहय, मार्गदर्शन या संघाच्या साह्याने उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. माजी विद्यार्थी संघाने शाळेसाठी आर्थिक साह्य देऊ केल्यास त्यांच्याकडून वस्तू, साहित्य स्वरुपात मदत घ्यावी असेही शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.