मुंबई : शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेळापत्रक जुळत नसल्याने शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे राज्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, परंतु देशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी वेळ नसल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक १७ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकडून १८ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले.

अर्ज केलेल्या शिक्षकांच्या १६ ते १८ ऑगस्टदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमधून निवड झालेल्या शिक्षकांची यादी १ सप्टेंबर राेजी शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार होती. मात्र शिक्षण संचालनालयाकडून ही यादीच जाहीर करण्यात आली नाही.

शिक्षकांचा गुणगौरव करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने हा पुरस्कार रखडला असल्याचे उघडकीस आले आहे. यंदा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येणाऱ्या शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुरस्कार वितरणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ आवश्यक असल्याने शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळताच वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाईल.

मात्र शिक्षण विभागाने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार रखडला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

दरम्यान शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा सप्टेंबर महिन्यात कधीही दिला जाऊ शकतो. त्यामुळे प्रस्तावाला मान्यता मिळताच पुरस्कार वितरित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.