मुंबई : परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. परदेशातील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून त्यानुसार अभ्यासक्रमांचा प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठीही एक सक्षम यंत्रणा तयार करण्यात यावी. आयटीआय मार्फत राबविण्यात येणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावेत. प्रशासनमार्फत केलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतली. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
रोजगारवाढीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीने कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने तपासली जावी. शासकीय आयटीआय जागतिक दर्जाच्या कौशल्य केंद्रात रूपांतरीत करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. त्यासाठी ‘मित्रा’ संस्थेकडूनही मार्गदर्शन घेण्यात यावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
आयटीआयमध्ये सौर तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन मेकॅनिक, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (३ डी प्रिंटिंग), ड्रोन तंत्रज्ञ, औद्योगिक रोबोटिक्स, एआय प्रोग्रामिंग असिस्टंट असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागासाठी त्यांच्या गरजावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, असे लोढा यांनी सांगितले. यावेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीबरोबर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विविध प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला. महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडचे प्रमुख प्रफुल्ल पांडे आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. लेविस यावेळी उपस्थित होते.