Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करा. मुंबईकरांना त्रास होईल, असे वागू नका. तातडीने मुंबईतील रस्ते मोकळे करा. मराठ्यांचा गर्व वाटेल, असे वागा. ज्याला गोंधळ घालायचा आहे, त्यांनी गावी निघून जावे, असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिले. आरक्षण घेतल्याशिवाय मी येथून उठणार नाही, असा इशाराही त्यांनी केला.
मराठा आंदोलनाबाबत अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आंदोलनाबाबत काही आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाचे आदेशांचे पालन करायचे आहे. सर्व आंदोलकांनी आझाद मैदानावर झोपायचे आहे. पार्किंगसाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या मैदानावर गाड्या लावा आणि त्या मैदानावरच झोपा. आझाद मैदानावर झोपण्यासाठी जागा मिळाली नाहीतर क्रॉस मैदानावर जा. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. गोंधळ घालणाऱ्यांची मला गरज नाही. समाजाची मान खाली जाईल, असे वागू नका. मराठ्यांचा गर्व वाटावा, असे वर्तन करा. ज्यांना माझे ऐकायचे नाही, त्यांनी आपल्या गाड्या घेऊन गावी निघून जावे, असेही जरांगे म्हणाले.
आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान
मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आजवर अनेक आंदोलने झाली, पण, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीला त्रास होईल, असे कुणीही वागले नाही. आता जाणीवपूर्वक मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. आंदोलकांना गोंधळ घालण्यासाठी, रस्ते अडविण्यासाठी उसकाविले जात आहे. पहिल्या दिवशी आंदोलकांची कोंडी केल्यामुळे गावाकडून इतके जेवण येत आहे, की संपूर्ण मुंबई जेवण करेल. मला आंदोलन यशस्वी करायचे आहे, त्यामुळे सयमाने वागा. गावाकडून येणाऱ्या लोकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा, असे न्यायालय सांगू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले.
मराठा – कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चार
आंदोलकांच्या वतीने मी कुणाला ही चर्चेला पाठविणार नाही. सरकारने चर्चेला यावे, मी मंत्रालयापासून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे. आंदोलन शांततेने होईल. सरकार शांततेत ही आंदोलकांचे बळी घेत आहे. मराठा – कुणबी एकच आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे – पाटील यांनी दिला.