Maratha Reservation Protest Mumbai मुंबई: आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल – ताशांच्या गजरात कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. ‘पाटील पाटील’ च्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. मंगळवारी दुपारी राज्य सरकारच्या वतीने वाटाघाटी करण्यात आल्या. त्यावेळी हैदराबाद गॅजेटसह एकूण तीन अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन यशस्वी झाले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

मागण्या यशस्वी झाल्याचे समजतात आझाद मैदान परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते बेभान होऊन नाचू लागले. मागील पाच दिवसांपासून असलेला थकवा आणि क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. कार्यकर्ते आनंदाने बेभान होऊन नाचत होते.

मराठे जिंकले, मैदान गर्दीने फुलले’

राज्य सरकारचे शिष्ठमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येताच आझाद मैदान पुन्हा एकदा गर्दीने फुलले. सर्व आंदोलक मैदानात जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी येऊ लागले. ‘पाटील पाटील’ आणि ‘दादा दादा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने मैदान दणाणून गेले. आमच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश आले. मराठ्यांनी करून दाखवले, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे घातलेल्या आंदोलकांमुळे सारा परिसर भगवा झाला होता.