मुंबई : मराठवाड्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरुच आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थितीचा धोका आणखी वाढला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आतापर्यंतच्या अपेक्षित सरासरी पावसापेक्षा २६ टक्के तर राज्यात १४ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. मराठवाड्यात १ जून ते २४ सप्टेंबरपर्यंत २४ ७८०.२ मिमी तर मध्य महाराष्ट्रात ८१२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या पहिल्या अंदाजानुसार राज्यात यंदा १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते.

मराठवाड्यातील पाटोदा, बीड, शिरुर यांसह इतर भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. या परिसरात बुधवारी देखील पावसाची संततधार सुरुच होती. दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मराठवाडा येथे १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत ७८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत येथे ६१६.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात ७१४.१ मिमी पाऊस अपेक्षित असतो. १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत ८१२.३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही सरासरीइतकी नोंद झाली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे. या पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

पैठण- २०० मिमी (२२ सप्टेंबर)

पाटोदा- १५० मिमी (२२ सप्टेंबर)

शिरुर- ५५ मिमी (२३ सप्टेंबर)

वाढवणी- ६७ मिमी (२२ सप्टेंबर)

पाथर्डी- १२७ मिमी (२३ सप्टेंबर)

शेवगाव- १६० मिमी (२२ सप्टेंबर)

भडगाव- १३९ मिमी (२२ सप्टेंबर)

पाचोरा- १४३ मिमी (२२ सप्टेंबर),

जून महिन्यात पावसाची मोठी तूट

जून महिन्यात मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशात पावसाची तूट होती. जून महिन्यातील पहिल्या २० दिवसांच्या कालावधीत या तीनही भागात पावसाने ओढ दिली होती. मराठवाड्यात ३९ टक्के आणि विदर्भात ५७ टक्के पावसाची तूट होती. त्याचा परिणाम या भागातील पेरण्यांवर झाला होता. त्यानंतर आता सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत या काही दिवसांत मराठवाड्यात अधिक पाऊस पडला आहे. त्याचबरोबर १ जून ते ११ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्वच भागांत पावसाची तूट नोंदली गेली होती. कोकणातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. संपूर्ण राज्यात सरासरी ९ टक्के पावसाची तूट होती.

राज्यातील पावसाची स्थिती

१ जून ते २४ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर कोकणातही सरासरीइतका पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्हा वगळता इतर भागात सरासरीइतका पाऊस झालेला आहे. सातारा जिल्ह्यात २२ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. तर, सर्वाधिक पाऊस हा धाराशिव येथे झाला आहे. तेथे ५१ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे.

गेल्यावर्षीचा पाऊस

गेल्यावर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात २० टक्के अधिक पाऊस पडला होता. सरासरी ६४२.८ मिमी पाऊस पडतो, ७७२.५ मिमी पाऊस पडला होता. मध्य महाराष्ट्रात ३९ टक्के अदिक पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात सरासरी ७४७.४ मिमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी १०३५.८ मिमी पाऊस पडला. याचबरोबर कोकण आणि विदर्भातही अधिक पावसाची नोंद झाली होती.

पश्चिम, पूर्व राजस्थानात सर्वाधिक

पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत पश्चिम राजस्थानमध्ये २८० मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. या भागात आत्तापर्यंत ४७४.५ मिमी म्हणजेच ६९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर, पूर्व राजस्थानमध्ये ६१९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा १००५.६ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच येथे ६२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्यात राजस्थानाच्या पूर्व भागात विदर्भाच्या जवळपास दुप्पट पाऊस पडला होता.